सावंतवाडी : वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा-वेळागर समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी संध्याकाळी आठ पर्यटक बुडाले. या दुर्घटनेत एक जण बचावला असून तिघांचे मृतदेह मिळाले असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. चार जणांचा शोध सुरू युद्धपातळीवर सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कुडाळा आणि बेळगाव येथील काही जण पर्यटनासाठी शिरोडा-वेळागर समुद्रकिनारी आले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने यापैकी आठ पर्यटक बुडाले. याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकांनी बचावकार्यास सुरुवात केली. इसरा इमरान कित्तुर (वय १७) या तरुणीला वाचविण्यास यश आले. फरान कित्तुर (वय ३४), इबाद कित्तुर (१३), नमिरा अक्तार (१६) यांचे मृतदेह बचाव पथकांच्या हाती आले आहेत.

मात्र इरफान मोहम्मद इसाक कित्तुर (३६ ), इक्वान इमरान कित्तुर (१५), फरहान मोहम्मद मणियार (२०), झाकिर निसार मणियार (१३ वर्ष) हे चौघेही अजूनही बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह कायदेशीर प्रक्रिया आणि तपासणीसाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.