विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या, गुरुवारी होत आहे. जिल्ह्य़ात बारा जागांपैकी सहा ते सात जागांवर अटीतटीच्या लढती झाल्या आहेत. त्यामुळे या जागांच्या निकालाबद्दल उत्सुकता राहील. भाजप-शिवसेना युतीने राज्यात निर्माण केलेले आव्हान विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी थोपावणार का, याबद्दल दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्याचा फैसला उद्याच्या मतमोजणीतून होईल. सकाळी ८ वा. मतमोजणी सुरु झाल्यावर अकरा-बारानंतर फेरीनिहाय मतदानाचा कल समजण्यास सुरुवात होईल. दुपारी दोन ते तीनपर्यंत अंतिम निकाल हाती येईल, असा निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सन २०१४ च्या निवडणुकीसाठी ७०.७५ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानाचा टक्का काहीसा घटून तो ६९.४३ झाला आहे. बारा जागांसाठी एकूण ११६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. गेल्या वेळी युती व आघाडीकडे प्रत्येकी सहा-सहा, त्यात भाजप ५, शिवसेना १, काँग्रेस ३ व राष्ट्रवादी ३ असे संख्याबळ होते. परंतु त्यानंतर यंदाच्या निवडणूक तोंडावर जिल्ह्य़ात बरीच उलथापालथ झाली. आघाडीतील तिघांनी युतीत प्रवेश केला. त्यामुळे युतीचे एकप्रकारे आव्हान निर्माण झाले होते. भाजपमध्ये प्रवेश करताना मातब्बर नेते राधाकृष्ण विखे यांनी बारा विरुद्ध शून्य असे चित्र राहील, असे आव्हान दिले. परंतु सुरुवातीला हे जिल्ह्य़ात निर्माण केले गेलेले एकतर्फी वातावरण न राहता किमान सहा ते सात मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत परावर्तित झाले. त्यातूनच युतीचे आव्हान आघाडी थोपवणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपने ८, शिवसेनेने ४, राष्ट्रवादीने ८ (पुरस्कृत वगळून) व काँग्रेसने ३ उमेदवार उभे केले आहेत.

कर्जत-जामखेडमधील मंत्री राम शिंदे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष आहे. याशिवाय अकोल्यातील भाजपचे वैभव पिचड व राष्ट्रवादीचे डॉ. किरण लहामटे, कोपरगावमध्ये भाजपच्या स्नेहलता कोल्हे व राष्ट्रवादीचे आशुतोष काळे, नेवाश्यातील भाजपचे बाळासाहेब मुरकुटे व शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे (राष्ट्रवादी पुरस्कृत) शंकरराव गडाख, शेवगावमधील मोनिका राजळे व राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे, पारनेरमध्ये शिवसेनेचे विजय औटी व राष्ट्रवादीचे नीलेश लंके यांच्यामध्ये अटीतटीची लढत रंगली. युती झाल्याने नगर शहरात सुरुवातीला शिवसेनेचे अनिल राठोड यांना अनुकूल वातावरण होते, मात्र नंतरच्या टप्प्यात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांनी आव्हान निर्माण केले. इतर ठिकाणी अपेक्षित चुरस निर्माण झाली नाही.

सर्व १२ मतदारसंघात मतमोजणी सकाळी ८ वा. सुरु होईल, सुरुवातीला टपाली व सैनिकी मतदारांचे प्राप्त झालेल्या मतांची मोजणी सुरु केली जाईल, नंतर लगेच १४ टेबलवर मतदान यंत्रातील मतांची मोजणी सुरु होईल. सुरुवातीच्या काही फे ऱ्यांना वेळ लागेल, नंतर त्यांना वेग येईल. मतदान केंद्राच्या परिसरात पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तसेच निवडणूक रिंगणातील प्रमुख उमेदवारांच्या घरांना संरक्षणही दिले आहे.

मतदारसंघनिहाय फेऱ्या

मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या होणाऱ्या फे ऱ्या पुढीलप्रमाणे-अकोले २२, संगमनेर २०, शिर्डी १९, कोपरगाव १९, श्रीरामपुर २२, नेवासे १९, शेवगाव २६, राहुरी २२, पारनेर २६, नगर शहर २१, श्रीगोंदे २५ व कर्जत-जामखेड २५.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhan sabha election bjp shivsena ncp akp 94
First published on: 24-10-2019 at 03:00 IST