लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असतानाच काँग्रेसचे नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. “आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती”, असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. तसेच भाजपाचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी हे सत्य न्यायालयापासून लपवून ठेवल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

“आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे”, असे विधान वडेट्टीवार यांनी केले. त्यानंतर पुन्हा या विधानावर स्पष्टीकरण देताना वडेट्टीवार म्हणाले, “आपण हे एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन बोललो आहे. यामध्ये मी काहीही म्हटले नसून विलासराव देशमुख त्यावेळी म्हणाले होते की, कसाबला फाशी झाली म्हणजे श्रेय घेण्याची गरज नाही. कारण कसाब दहशतवादी होता, त्याला फाशी होणारच होती. त्यामुळे बडेजावपणा दाखवायची गरज नाही. मी एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला असून याबाबत त्यांना (उज्वल निकम यांना) काही खुलासा करायचा असेल तर त्यांनी करावा”, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा : महायुतीचं सरकार भक्कम असताना भाजपाला अजित पवारांची गरज का भासली? आशिष शेलार म्हणाले, “उद्धव ठाकरे…”

“मुंबई दहशवादी हल्ला प्रकरणी न्यायालयामध्ये जे पुरावे सादर करायला हवे ते उज्ज्वल निकम यांनी सादर केले नाही”, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या विधानावरुन राजकारण तापले आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामधून भाजपाने उज्ज्वल निकम यांना लोकसभेचे तिकीट दिलेले आहे. उज्ज्वल निकम यांच्या विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड निवडणुकीच्या मैदानात आहेत. सध्या प्रचार जोरदार सुरू असून विजय वडेट्टीवार यांच्या विधानाला आता भाजपाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटलं?

“विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी कसाबची नव्हती, असा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला. निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपाला विरोध करण्यासाठी तुम्ही २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा. जेव्हापासून मोदीजी सत्तेत आले दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळत आहेत. महाराष्ट्रात मविआ सत्तेत असताना याकुबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं आता कसाबचा पुळका आला आहे. यांच्या पाकधार्जिण्या भूमिकेबद्दल जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवार यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे.