शिवस्मारकाच्या कामात अनियमितता असून त्याची चौकशी करा अशी मागणी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. ही मागणी सध्या केलेली नसून दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या पत्रातून करण्यात आली होती. शिवस्मारकाच्या अनियमिततेची चौकशी करा, अन्यथा मला विधान परिषदेत अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणावा लागेल असं विनायक मेटे यांनी पत्रात म्हटलं आहे.

विनायक मेटे यांनी पत्रात भयानक चुका आणि बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. विनायक मेटे यांनी हे पत्र 15 सप्टेंबर 2018 रोजी लिहिलं होतं. पत्रात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील मंत्रालयीन अधिकारी प्रकल्प अनैतिकतेने पुढे रेटत असल्याचा आरेप केला आहे.

विनायक मेटे यांनी पत्रात शिवस्मारकाचे सल्लागार मे. इजिस इंडिया आणि कंत्राटदार एल अँड टी कंपनीसोबत मंत्रालयीन अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा ठपका ठेवला आहे. दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करा अन्यथा इतिहास आपल्याला कदापी माफ करणार नाही असंही विनायक मेटे यांनी पत्रात म्हटलं आहे.