लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेस उमेदवारीची आशा कायम ठेवत प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सोमवारी काँग्रेस व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, मंगळवारीही जोरदार शक्तीप्रदर्शनाने त्यांचा पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

महाविकास आघाडीकडून उबाठा शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, मेरीटच्या जोरावर या जागेवर काँग्रेसने हक्क सांगितला असला तरी मविआच्या संयुक्त बैठकीत उबाठा शिवसेनेलाच ही जागा देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मात्र, यामुळे काँग्रेसची नाराजी वाढली असून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पाटील यांनी आज गनिमी काव्याने मोजयया कार्यकर्त्यांसह आज उमेदवारी अर्ज दाखल केले.

आणखी वाचा-सोलापुरात काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी राम नवमीचा मुहूर्त

दरम्यान, सांगलीतील जागेबाबत चर्चा करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना आज नागपूरला पाचारण केले आहे. विशाल पाटील वगळता माजी राज्यमंत्री डॉ.विश्‍वजित कदम, जिल्हाध्यक्ष आमदार सावंत आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे नागपूरला रवाना झाले असून संध्याकाळी उशिरा सांगलीबाबत चर्चा केली जाणार असल्याचे आमदार सावंत यांनी सांगितले.

दरम्यान, उद्या सकाळी गणेशाचे दर्शन घेउन विशाल पाटील काँग्रेस समितीपर्यंत पदयात्रा काढणार असून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून याच दरम्यान, मोजयया कार्यकर्त्यांसह श्री. पाटील यांचा काँग्रेसच्यावतीने पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे आमदार सावंत यांनी सांगितले. अखेरपर्यंत आमचे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्न राहतील आणि आम्हाला ती मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा-ओमराजे, अर्चना पाटील, संयोजिनी राजे यांनी घेतले उमेदवारी अर्ज, लोकसभेसाठी चौथ्या दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडीच्या मेळाव्याकडे काँग्रेसची पाठ

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी आघाडीतील घटक पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा सोमवारी सांगलीत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास शिवसेनेचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील उपस्थित होते. मात्र काँग्रेसच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली. यामुळे मविआमध्ये बिघाडी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.