महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही जागावाटपावरून धुसफुस सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ठाकरे गटाने या मतदारसंघात चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून प्रचाराला सुरूवातदेखील केली आहे. त्यावरुन काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. सागली लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेस निवडणूक लढवत आली आहे. आघाडीत (यूपीए) यापूर्वी काँग्रेसने ही जागा कधीही इतर पक्षांना दिली नाही. मात्र यंदा महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस नेते पक्षावर नाराज आहेत.

पलूस-कडेगावचे आमदार आणि सांगलीतले स्थानिक नेते विश्वजीत कदम तसेच विशाल पाटील यांनी गेल्या आठवड्यात (२७ मार्च) दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि वरिष्ठ काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली होती. या भेटीत कदम आणि पाटील यांनी सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रयत्न करावेत अशी गळ घातली. या भेटीनंतर विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी विश्वजीत कदम म्हणाले, आम्ही पक्षश्रेष्ठींना ठामपणे सांगितलं आहे की, ही जागा आपल्याला मिळायला हवी.

विशाल पाटील हे सागली लोकसभेची जागा लढवण्यास इच्छूक आहेत आणि त्यांना सर्व स्थानिक काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे. मात्र ठाकरे गटाने सांगली लोकसभेचा उमेदवार जाहीर करून पाटील, कदम यांच्यासह सांगलीतल्या काँग्रेस नेत्यांची गोची केली आहे. दरम्यान, विशाल पाटील यांनी कोणत्याही परिस्थिती निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतल्यामुळे पाटील सांगलीत बंडखोरी करणार असल्याची चर्चा आहे. विशाल पाटील अपक्ष उमेदवार म्हणून सांगली लोकसभेची जागा लढवण्यास इच्छूक असल्याचं बोललं जात आहे. यावर विश्वजीत कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विश्वजीत कदम, विशाल पाटील यांच्यासह स्थानिक काँग्रेस नेते आज (५ एप्रिल) पुन्हा एकदा दिल्लीत काँग्रेस हायकमांडच्या भेटीसाठी जाणार आहेत. तत्पूर्वी विश्वजीत कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी विश्वजीत कदम म्हणाले, मी, विशाल पाटील आणि आमचे इतर सहकारी दिल्लीत जाऊन मल्लिकार्जुन खरगे आणि के. सी वेणुगोपाल यांची भेट घेणार आहोत. सांगली लोकसभेबाबत माझी भूमिका ठाम आहे. आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत की, काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे सांगली लोकसभेबाबतचा निर्णय सांगावा.

हे ही वाचा >> “शिवसेना-राष्ट्रवादीने काँग्रेसची धुळधाण केलीय, मी तिकडे असताना…”, अशोक चव्हाणांचा टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विश्वजीत कदम यांना प्रश्न विचारण्यात आला की, जागावाटपाचा तिढा सुटला नाही तर विशाल पाटील अपक्ष लढणार आहेत का? त्यावर विश्वजीत कदम म्हणाले, या प्रश्नाचं उत्तर मी जर-तरचे संदर्भ लावून देणार नाही. आम्ही काँग्रेस नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात योग्य निर्णय घेऊ.