सांगली : विटा मर्चंटस् बँकेचा संचित तोटा १६ कोटींवरून ४ कोटीवर आणण्यात संचालक मंडळाला यश आले असून पुढील वर्षी सभासदांना लाभांश देण्यास संचालक मंडळ बांधील आहे असे बँकेचे अध्यक्ष विनोद गुळवणी यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले.
बँकेची ८१ वी वार्षिक सभा जय मल्टिपर्पज हॉलमध्ये अध्यक्ष गुळवणी यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली. यावेळी प्रारंभी उपाध्यक्ष उत्तम चोथे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव म्हेत्रे यांनी अहवाल सालात दिवंगत झालेल्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
श्री. गुळवणी यांनी सांगितले, बँक काही वर्षापुर्वी आर्थिक संकटात सापडली होती. यामुळे रिझर्व्ह बँकेने २००५ पासून निर्बध लागू केले होते. मात्र, कर्जवसुली व खर्चावर नियंत्रण ठेवत बँक आता आर्थिक संकटातून बाहेर आली असून बँकेची प्रगती पाहून रिझर्व्ह बँकेने लागू केलेले निर्बंधही डिसेंंबर २०२४ पासून उठवण्यात आले आहेत. बँकेचा संचित तोटा १५ ते १६ कोटीवर पोहचला होता. सध्या हा तोटा ४ कोटी ३५ लाख रूपयापर्यंत कमी करण्यात संचालक मंडळ यशस्वी झाले आहे.
बँकेचा तोटा मार्च २०२६ पर्यंत पूर्णपणे भरून निघेल आणि पुढील वर्षी सभासदांना लाभांशही मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. बँकेचे कर्ज वाटप ११० कोटी असून ठेवी १८१ कोटी आहेत. बँकेचे आठ जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असून प्रधान कार्यालयासह २२ शाखामध्ये १३० कर्मचारी कार्यरत आहेत. लेखा परिक्षणात बँकेला अ वर्ग दर्जा प्राप्त झाला असून आर्थिक शिस्त पालन करण्याचे आदेश स्व. आमदार अनिल बाबर यांनी दिेले होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच बँक आता प्रगतीपथावर असल्याचेही श्री. गुळवणी यांनी सांगितले.
बँकेच्या प्रगतीमध्ये कर्मचारी वर्गाचेही मोलाचे योगदान असून याबद्दल कर्मचार्यांना एक महिन्याचे वेतन बोनस म्हणून आणि एक महिन्याचे वेतन सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सेवक वर्गास ऑक्टोंबर २०२५ पासून एक हजार ते २२५० रूपये मासिक वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. विषयपत्रिकेवरील १३ विषयांना सभेने मंजुरी दिली.
विटा मर्चटस् बँकेचा संचित तोटा भरून काढत असताना प्रशासनाने वसुलीवरही भर दिला आहे. यामुळे थकित कर्ज वसुली चांगल्या प्रकारे करण्यात यश आले आहे. रिझर्व्ह बँकेने व्यक्तीला दीड कोटी व समूह कर्ज चार कोटीपर्यंत देण्यास मंजुरी दिली असून बँकेचा व्यवसायही वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकेचा नेट एनपीए २.७९ टक्के होता, तो पुढील आर्थिक वर्षापर्यंत शून्यावर आणण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असून बँक निश्चितपणे फायद्यात जाणार आहे. बँकेचे २२ हजार सभासद असून पुढील वर्षापासून सभासदांना लाभांश देण्याचे नियोजन संचालक मंडळाने केले असल्याचे अध्यक्ष गुळवणी यांनी सांगितले.