दापोली : कोकणात अनेक पारंपरिक सण उत्सव साजरे केले जातात. पण आपल्या पशुधनाच्या रक्षणासाठी दिवाळी साजरा होणारा ‘वाघबारस’ हा अनोखा व काही ठिकाणी पारंपारिक साजरा होणारा हा सण मुक्या प्राण्यांविषयीचे ममत्व आणि त्याच्या जीविताच्या रक्षणाची काळजी वाहणारा म्हणून अनोख स्थान मिळवून आहे. गुहागर तालुक्यातील तळवली गावात आजही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होताना दिसून येते. कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादिशीला तळवली गावातील काही वाड्या एकत्र येऊन हा सण साजरा करतात. विशेषता प्रत्येक वाडीस्तरावर तर काही ठिकाणी दोन ते तीन वाड्या एकत्र येऊन हा सण साजरा करतात.
भात कापणी पूर्ण झाल्यावर पाळीव प्राणी मोकाट सोडले जातात. ही गुरे जंगल भागात जातात. वाघ,बिबट्यांपासून प्रसंगी त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी “वाघबारस” हा सण साजरा केला जातो,अशी महिती वयोवृद्धांकडून दिली जाते. या दिवशी वाडीवस्त्यांवरून तांदूळ व पैसे गोळा केले जातात. यातून जंगलातील एका ठरलेल्या विशिष्ट ठिकाणी एकत्रितरित्या जेवण बनवले जाते. दोन उपवास धारकांना रंगरंगोटी करून त्यांची पूजा केली जाते.
वाघ वाघिणी समजून त्यांना त्यानंतर ठरलेल्या अंतरापर्यंत पिटाळण्यात येते. तसेच यावेळी जवळील नदी- नाल्यात खेकडे मासे पकडून शिजविण्यात येतात आणि जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात होतो. जंगलामध्ये जेवणाचा हा कार्यक्रम करण्यासाठी अनेक जण मोठ्या उत्स्फूर्तपणे यात सहभागी होतात. त्यावेळी जणू वनभोजनाचा आनंद लुटताना प्रत्येक जण दिसून येतो. हा सण दरवर्षी विविध ठिकाणी प्रथापरंपरेनुसार आजही साजरा केला जातो. असे केल्याने वाघ शांत होतो व गुरांना त्याचा त्रास होत नाही त्यांचे रक्षण होते अशी ग्रामस्थांची धारणा आहे. यावर्षी देखील तळवलीतील विविध वाड्यांमधून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तळवली परिसरातील आगरवाडी, भेळेवाडी, डावलवाडी या वाड्यांमधील अबालवृद्ध मोठ्या हौसेने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
