सातारा : संतोष पोळ प्रमुख आरोपी असणारा धोम वाई खून खटला जलद गतीने चालवावा, अशा सूचना न्यायालयाने आज केल्या. आजच्या खटल्यात माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिचा हंगामी जामीन संपल्यामुळे तिला ती न्यायालयासमोर शरण आली. न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या खटल्याची सुनावणी वाई येथील प्रथम वर्ग अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांच्यासमोर सुरू आहे.
आजच्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम न्यायालयात उपस्थित होते. संतोष पोळ यालाही मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले होते. सरकारी वकील मिलिंद ओक यावेळी उपस्थित होते. मागील नऊ वर्षांपासून या खटल्याचे कामकाज सुरू असल्याने यापुढे हा खटला जलद गतीने चालवावा, यासाठी दोन दोन दिवसाला सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले. वेगवेगळ्या कारणांमुळे या खटल्याची सुनावणी लांबत असल्याने न्यायालयाने चिंता व्यक्त केली व जलद गतीने सुनावणी करण्याची सूचना केली.
या खटल्यातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे आरोग्य आणि परीक्षेच्या कारणास्तव हंगामी जामिनावर होती. तिची मुदत संपल्याने ती न्यायालयासमोर हजर झाली. न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. ज्योती मांढरेचा नथमल भंडारी, सलमा शेख यांच्या खुनाचा उलट तपास संपला. मंगल जेधे यांच्या खुनाचा उलट तपास सुरू आहे. हा जबाब संतोष पोळच्या वकिलांनी घेतला.
संतोष पोळच्या सांगण्यावरून दहा सिम कार्ड विकत घेतल्याची माहिती उलट तपासात ज्योती मांढरे हिने न्यायालयात दिली. पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या मोबाईल संभाषणाचे कॉल रेकॉर्ड (सीडीआर) संतोष पोळचे वकिलांनी मान्य केले. पुढील सुनावणी १९ जून रोजी होणार आहे.