दोन दिवसांपूर्वी अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. आपल्या महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान अमित शाह यांनी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटले. यावर उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याच दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. मोगॅम्बोने मला तळवे चाटणारा म्हटलं आहे पण आता राज्यात कोण कुणाचं काय चाटतंय तेच कळत नाही असं खोचक उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. अमित शाह यांचा उल्लेख मोगॅम्बो असा केला गेला. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत.

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?

राजकारणात कधी माणूस वर जातो कधी खाली जातो. पण इतकं निराश होऊन काहीही बोलायचं यावरून त्यांच्या बुद्धिची किव केली जाते. संजय राऊत यांचे आरोप निर्बुद्ध लोकांचे आरोप आहेत अशा लोकांना मी काय उत्तर देऊ? आणि उद्धव ठाकरेंकडे एक लिमिटेट डिक्शनरी आहे. १५-२० शब्द त्यात आहेत त्यातले शब्द ते फिरवून फिरवून वापरतात. त्यात काय उत्तर द्यायचं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

माजी राज्यापालांनी सांगितलं ते योग्यच

१२ आमदारांच्या नियुक्तीवरून उद्धव ठाकरे यांनी धमकीवजा पत्र त्यावेळी राज्यपाल असलेल्या भगतसिंह कोश्यारींना लिहिलं होतं हे जे सोमवारी कोश्यारी यांनी सांगितलं ते योग्यच आहे. राज्यपाल या पदावर बसलेला माणूस अशा प्रकारच्या पत्रांना उत्तर देत नसतो. त्यांनी जर व्यवस्थित भाषेत १२ आमदारांच्या नियुक्तीची विनंती केली असती तर निर्णय झाला असता असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांची शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण कार्यक्रमात उपस्थिती होती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला आणि म्हणाले की त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढवल्या. पंतप्रधान मोदी यांचा फोटो प्रचारात लावला. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं जाईल याचा उल्लेख त्यांनी ऐकला होता. तसंच त्यांनीही तो उल्लेख केला होता. मात्र निकाल लागल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले असं अमित शाह यांनी म्हटलं होतं. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांचा उल्लेख मोगॅम्बो असा केला. त्यावरून आज देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंकडे लिमिटेड डिक्शरनी असल्याचं आणि त्यातलेच १५-२० शब्द ते फिरवून फिरवून वापरत असल्याचं म्हटलं आहे.