सोलापूर : राज्यात महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्याचा निर्णय पक्का असून त्या अनुषंगाने ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आपले बोलणे झाले आहे. राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांसाठी ४८ जागांपैकी ३६ जागांवर महाविकास आघाडीमध्ये एकमत झाले आहे. उर्वरीत १३ जागांच्या संदर्भात चर्चा सुरू असून त्यावरही लवकरच समझोता होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
पवार हे दोन दिवसांच्या भेटीसाठी सोलापुरात आले होते. शनिवारी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, लोकसभेसाठी राज्यात महाविकास आघाडीमध्ये सकारात्मक संवाद असून भाजपसह महायुतीच्या विरोधात भक्कमपणे लढण्याची क्षमता बाळगून महाविकास आघाडी उतरणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत व इतर नेते यशस्वीपणे चर्चा करीत आहेत. या चर्चेत आपण स्वतः सहभागी नसलो तरी आमच्या नेत्यांकडून अहवाल येतो, असे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा – “सरकार म्हणून माझी भूमिका संपली, मी आता…”, बच्चू कडूंचं विधान
महाविकास आघाडी भक्कम होण्यासाठी शेकापसह डाव्या पक्षांनाही सोबत घेतले जाणार असून वंचित बहुजन आघाडीला आमच्या सोबत घेणार आहोत. हा निर्णय पक्का आहे. यासंदर्भात आपले ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणे झाले आहे, असेही पवार यांनी सांगितले.