५७ वर्षे झाली तरीही शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा आपण मोडली नाही. यापुढेही मोडणार नाही. ज्यांनी मोडता घालण्याचा प्रयत्न केला त्यांना मोडीत काढून आपण पुढे चाललो आहोत. आपला मेळावा झाल्यानंतर आपण खोकासुराचं दहन करणार आहोत. रामाने रावणाचा वध का केला? कारण मी ऐकलं आहे की रावणही शिवभक्त आहे. तरीही रामाला त्याला मारावं लागलं कारण रावण माजला होता. रावणाने सीतेला पळवलं होतं. त्याचप्रमाणे आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतो आहे. एक खबरदारी त्यांनी घेतली आहे की त्यांनी आपला धनुष्यबाणही चोरला आहे. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांवर टीका केली आहे. दसरा मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

गद्दारांची खोक्यांची लंका जाळणार

मारुतीरायाने रावणाची सोन्याची लंका दहन केली होती. तशी या गद्दारांची खोक्यांची लंका आहे त्या पेटवणाऱ्या हजारो मशाली आपल्याकडे आहेत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. हल्ली एक जाहिरात येते त्यात अक्षय कुमार, अजय देवगण आणि शाहरुख खान हे कमला पसंद वाले आहेत. तसं या गद्दारांना कमळा पसंत आहे. आमच्या नादाला आता त्यांनी लागू नये असाही टोला उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मनोज जरांगेचे विशेष आभार

मी आज जरांगे पाटील यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी योग्य भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं शांततेत आंदोलन सुरु होतं. मात्र या डायर सरकारने जालियनवालाप्रमाणेच या शांततेत सुरु असलेल्या आंदोलनावर लाठी हल्ला केला. मी त्या सगळ्या लोकांची भेट घेतली आणि वेदना जाणून घेतल्या असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंनी सांगितला तो अनुभव

एका घरात मी गेलो तेव्हा मिणमिणता दिवा. त्या घरातली माऊली माझ्यासाठी पंचारती घेऊन उभ्या होत्या. त्यावेळी मला ताईंना मी म्हटलं की मला ओवाळू नका. मग त्यांनी मला राखी बांधली त्यावेळी तिच्या डोळ्यात पाणी आलं. मला तिने लाठीचार्जचा अनुभव सांगितला. त्यांच्या सुनेला आणि मुलाला बेदम मारलं होतं. त्यांची डोकी फोडली. इतक्या निर्घृणपणे हे सरकार यांच्याशी वागलं आहे हे कळण्यासाठी मी तुम्हाला हे उदाहरण दिलं आहे. मी मुख्यमंत्री असतानाही मराठा आंदोलन सुरुच होतं. पण अशा रानटी लाठीमाराचा आदेश कुणी दिला? जालन्याचा डायर कोण आहे? याचा काही पत्ता लागलेला नाही. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.