Anil Parab on Ramdas Kadam: शिवसेनेच्या (शिंदे) दसरा मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या विधानावरून आता दोन्ही पक्षात शाब्दिक युद्ध छेडले गेले आहे. रामदास कदम यांनी केलेल्या टिप्पणीला शिवसेनेचे (ठाकरे) नेते, माजी मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेद्वारे प्रत्युत्तर दिले. यात त्यांनी कदम यांच्यावर पलटवार करताना रामदास कदम यांच्या पत्नीच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचा आणि पुतण्याने केलेल्या आत्महत्येचा उल्लेख करत निरनिराळे दावे केले आहेत. या दाव्यांचा त्यांच्याकडे पुरावा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर आरोप करताना त्यांचा मुलगा आणि राज्याचे विद्यमान गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना काही प्रश्न विचारले. ते गृह राज्यमंत्री असल्या कारणाने त्यांनी त्यांच्या कुटुंबातील एका प्रसंगाची चौकशी करावी, असे आव्हान परब यांनी दिले.

दरम्यान या आरोपांवर रामदास कदम यांनी उत्तर दिले असून परब यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

१९९३ सालच्या घटनेचा केला उल्लेख

“१९९३ साली तुझ्या आईने आत्महत्या करण्याचा किंवा जाळून घेण्याचा प्रयत्न का केला होता? याची चौकशी कर. माझे आव्हान आहे की, नार्को टेस्ट झालीच पाहिजे. यामध्ये बाळासाहेबांचे ठसे कुणी घेतले? का घेतले? याची चौकशी झाली पाहिजे. पण त्याचबरोबर १९९३ साली रामदास कदम यांच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? याचाही तपास केला पाहिजे”, असे विधान अनिल परब यांनी केले.

अनिल परब यांनी या घटनेची आणखी माहिती दिली. “खेडमध्ये आजही या घटनेचे साक्षीदार आहेत. वेळ पडली तर त्यांनाही मी समोर आणू शकतो. खूप साक्षीदार आहेत, जे आजही यातील सत्य मांडण्यास तयार आहेत. आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्यांचे पाहायचे वाकून, ही प्रवृत्ती सोडून द्या”, असा इशाराही त्यांनी दिला.

कदम यांच्या पुतण्याने आत्महत्या का केली?

एवढेच नाही तर रामदास कदम यांच्या पुतण्याने आत्महत्या केलेली आहे. ही आत्महत्या का केली? याचाही शोध गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहीजे, असेही परब म्हणाले. तुमच्या घरातील लोक आत्महत्या का करतात, त्याच्या मुळाशी गेले पाहिजे, त्याचा शोध तुम्ही घ्या. त्याची चौकशी करा. खेडमध्ये जो धुमाकूळ सुरू आहे, त्याची आगामी अधिवेशनात वाच्यता केली जाईल, असेही सूचक विधान परब यांनी केले.

रामदास कदम काय म्हणाले होते? पाहा व्हिडीओ

बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस घरीच ठेवला?

दरम्यान रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत केलेल्या दाव्यांना अनिल परब यांनी खोडून काढले. रामदास कदम यांचे आरोप शंभर टक्के खोटे आहेत, असे सांगून परब यांनी २०१२ सालचा घटनाक्रम उलगडला. ते म्हणाले, “बाळासाहेबांच्या अंतिम क्षणी त्यांना पाहायला मोठी गर्दी होती. माध्यमांनी सांगावे कोणताही मृतदेह दोन दिवस शवपेटी शिवाय ठेवता येऊ शकतो का? याबाबत रामदास कदमांची अक्कल गुडघ्यात आहे. त्यांना जे काय कुणी सांगितले आहे, त्याने हा तरी विचार करायला पाहिजे होता किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता. बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह दोन दिवस घरात ठेवला गेला हा धादांत खोटा आरोप आहे.”

ताजी अपडेट – रामदास कदम यांनी दिले उत्तर…

अनिल परब यांच्या आरोपाला रामदास कदम यांनी उत्तर दिले आहे. ‘माझ्या पत्नीने स्वत:ला जाळून घेतले नव्हते, तर स्टोव्हचा भडका उडाला होता. मी तेव्हा तिथेच होतो. माझ्या पत्नीला वाचवताना माझेही हात भाजले होते. पुढील सहा महिने माझी पत्नी जसलोक रुग्णालयात उपचार घेत होती. तेव्हा मी तिथेच होतो’, असे रामदास कदम म्हणाले आहेत. माझ्या पत्नीच्या संदर्भात अनिल परब जे बोलले आहेत. त्या विरोधात मी न्यायालयात जाणार आहे, असा इशारा कदम यांनी दिला.

तसेच माझ्या कोणत्याही पुतण्याने आत्महत्या केलेली नसल्याचेही रामदास कदम म्हणाले. पत्नी आणि पुतण्याबद्दल अनिल परब यांनी बिनबुडाचे दावे केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.