अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हं दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी वानखेडेंसंदर्भातील एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात कोणी तक्रार दाखल करुन आक्षेप घेतला तर सामाजिक न्याय मंत्रालयाच्या मार्फत वानखेडेंची चौकशी केली जाईल असं मुंडे म्हणाले आहेत. मुंडेच्या अंतर्गत येणाऱ्या सामाजिक न्याय मंत्रालयाकडून यासंदर्भातील तपासाचे संकेतच या वक्तव्यातून त्यांनी दिलेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी हे वक्तव्य केलं. “समीर वानखेडे यांच्या जातप्रमाण पत्राच्या वैधतेबद्दल कोणी आक्षेप घेतला, त्यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार केली तर आम्ही या प्रकरणी चौकशी करु,” असं मुंडे म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केलेत. त्यामध्येच त्यांनी समीर वानखेडे हे मुस्लीम असून त्यांनी मुस्लीम असल्याचं लपवत चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये नोकरी मिळवल्याचा आरोपही केलाय. यावरुनच मुंडे यांनी या इशारा दिलाय.

दरेकरांनी केली टीका…
याच मुद्द्यावरुन भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीला केवळ समीर वानखेडेंवर हल्लाबोल करायचा आहे अशी टीका केली. “राज्याच्या सामाजिक न्याय विभागाला तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर तपास करण्याचे हक्क आहेत. सध्या समीर वानखेडे हेच या सरकारच्या एकमेव अजेंड्यापैकी एक आहेत. वानखेडे हे काही आमच्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा भाजपा नेत्याचे नातेवाईक नाहीत. ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला लक्ष्य करणं हे योग्य नाहीय,” असं दरेकर म्हणालेत.

चंद्रकांत पाटलांना अशी भाषा शोभत नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीसह भाजपावर सडकून टीका केली. यावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यासारखे लोक मी खिशात ठेवतो, असं वक्तव्य केलं. याच वक्तव्यालाही मुंडे यांनी उत्तर दिलंय. चंद्रकांत पाटलांना अश भाषा शोभत नाही, असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं. ते बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. “चंद्रकांत पाटलांना अशी भाषा शोभत नाही. चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत किंवा भाजपाच्या कुठल्याच राज्य किंवा केंद्रातील नेत्यांचे खिसे मोठे नाहीत. ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोलायला पाहिजे,” असं मुंडेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will probe aryan khan case ncb officer sameer wankhede caste certificate charges if someone objects to the validity says minister dhananjay munde scsg
First published on: 31-10-2021 at 12:59 IST