केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी हस्तक्षेप केल्यानंतर मरोठी रूग्णालयास अतिरिक्त खाटांची परवानगी मिळाली असून, आवश्यक वैद्यकीय साहित्य देखील गडकरींनी उपलब्ध करून दिले आहेत.

हिंगणघाट येथे डॉ. राहूल मरोठी यांचे खासगी रूग्णालय आहे. त्यांना करोना रूग्णासाठी पूर्वी २५ खाटांची परवानगी प्रशासनाने दिली होती. मात्र प्राणवायू तुटवडा वाढू लागल्याने दहाच खाटा मंजूर झाल्या. परिसरातील करोनाबाधितांची हेळसांड होत असल्याचे निदर्शनास आल्यावर मनसे नेते अतुल वांदिले यांनी त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्याशी संपर्क केला. त्यांना केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याशी या अनुषंगाने बोलण्याची विनंती केली. त्यानंतर लगेचच हिंगणघाटचे काही डॉक्टर हेमंत गडकरी यांच्यासोबत नितीन गडकरींना भेटले. अडचणी सांगितल्या.

केंद्रीय गडकरी यांनी लगेच जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याशी बोलून २५ खाटा देण्याचे सूचविले. एवढच नाहीतर डॉ. मरोठी यांना व्हेंटीलेटरबाबत विचारणा करत आणखी दोन व्हेंटीलेटर देखील उपलब्ध करून दिले. त्यासोबतच २५ लक्ष रूपये किंमतीचे अन्य साहित्यही सोबत दिले. रूग्णालयाचे डॉ. प्रसाद गमे व डॉ. राहूल मरोठी यांनी मदतीबद्दल गडकरींचे आभार मानले.