नांदेडमधील गोळीबाराच्या घटना मागील काही दिवसांपासून थांबल्या असतानाच सोमवारी रात्री एका मालवाहू वाहनाच्या खरेदी-विक्रीच्या वादातून महिलेवर गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात महिलेच्या हाताला गोळी लागून दुखापत झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हेही वाचा- जालना : दर्शनावरून परतणारे दोघे अपघातात ठार
शहरातील शक्तीनगर भागातील सविता बाबूराव गायकवाड ह्या सोमवारी रात्री बाफना पुलावरून ११.१५ वाजेच्या सुमारास आपल्या घराकडे परत निघाल्या होत्या. परभणी येथील आरोपी रहीम खान नूर खान, जाफर व अन्य एका अनोळखी व्यक्तीने त्यांना बाफना पुलावर गाठले व त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्यांच्या हाताला गोळी लागून दुखापत झाली.
आरोपी व गायकवाड यांचे मागील काळापासून एका आयशर गाडीच्या खरेदी-विक्रीवरून वाद असून या वादातूनच ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी इतवारा पोलिसांनी सविता गायकवाड यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.