सातारा: साताऱ्याचा ऐतिहासिक शाही दसरा गुरुवारी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने जल्लोषात, पण साधेपणाने साजरा झाला. शाही मिरवणुकांना फाटा देऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी साधेपणाने सीमोल्लंघन करत सातारकरांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी जलमंदिर येथील भवानी देवी मंदिरामध्ये ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या भवानी तलवारीचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले.
शिवतीर्थ येथे सीमोल्लंघन झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यात विजयादशमीचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. सोहळ्याच्या प्रारंभी जलमंदिर येथे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. यानंतर भवानी तलवारीस पोलीस विभागामार्फत शासकीय मानवंदना देण्यात आली. यानंतर संध्याकाळी जलमंदिर येथून शाही मिरवणुकीला प्रारंभ झाला.
शिंग तुतारी हलगीवादन झाल्यानंतर सजवलेल्या पालखीतून भवानी तलवारीची मिरवणूक काढण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह पायी शिवतीर्थ येथे पोहोचले. शिवतीर्थ येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा सर्व परिसर रोषणाईने सुशोभित केला होता. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुन्हा उदयनराजे यांनी भवानी तलवारीची पूजा केली आणि सातारकरांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. यंदाचा सोहळा पारंपरिक जल्लोषात पार पडला. मात्र, त्याला साधेपणाची किनार होती. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी उदयनराजे यांनी अतिरिक्त खर्च टाळण्याचे आवाहन केले होते. या दसरा महोत्सवाच्या मिरवणुकीत सातारकर सहभागी झाले होते.
सातारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आदिशक्तीला वाजत-गाजत उत्साहाने निरोप देण्यात आला. तसेच सीमोल्लंघनाचे पारंपरिक सोहळे मोठ्या उत्साहात पार पडले.जिल्हा पोलिसांनी जिल्हाभर सुमारे साडेपाचशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. साताऱ्यातच देवीची विसर्जन मिरवणूक सुमारे ११ तास रंगली. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील देवींच्या विसर्जनासाठी तळ्यांची सोय करण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सातारा शहरातील ९८ उपद्रवी प्रवृत्तींना हद्दपार करण्यात आले होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी सायंकाळनंतर जलमंदिर येथे सातारकरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यांना सोने देत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी माजी सभापती सुनील काटकर व रक्षक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष सुशील मोझर उपस्थित होते. विजयादशमीच्या निमित्ताने साताऱ्यातील दोन्ही राजे पुन्हा एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. साताऱ्यात दसऱ्यानिमित्त (विजयादशमी) राजघराण्याकडून भवानी तलवारीचे पारंपरिक पूजन केले जाते आणि त्यानंतर तलवारीच्या पालखीसह (शाही सीमोल्लंघन) मिरवणूक काढली जाते. जो एक ऐतिहासिक आणि जल्लोषपूर्ण सोहळा असतो.
विजयादशमीच्या पवित्र दिवशी साताऱ्याच्या जलमंदिर पॅलेसमध्ये भवानी तलवारीचे विधिवत पूजन करण्यात येते. हे पूजन राजघराण्याच्या परंपरेनुसार होते. पूजन झाल्यानंतर भवानी तलवार फुलांनी सजवलेल्या पारंपरिक पालखीत ठेवली जाते. वाजत गाजत या पालखीसोबत मिरवणुकीने पोवई नाका येथील शिवतीर्थावर पूजनाच्या ठिकाणापर्यंत आणले जाते आणि नंतर पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन केले जाते. हा सोहळा साताऱ्याच्या राजघराण्याची आणि पारंपरिक संस्कृतीची एक महत्त्वाची ओळख आहे. हा साऱ्यांमधील एक उत्साहपूर्ण आणि मंगलमय सोहळा असतो, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात.