Anjali Damania and Susham Andhare Twitter War : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या व प्रवक्त्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यात ट्वीटर वॉर रंगलं आहे. अंजली दमानिया यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टवर टाकलेल्या एका मेसेजमुळे हा वाद उफाळून आला आहे.
अंजली दमानिया यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्ट मेसेंजरवरून सुषमा अंधारे अजित पवार गटात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला होता. त्यांच्या या ब्रॉडकास्टचं स्क्रीन शॉट काढून सुषमा अंधारे यांनी एक्सवरून त्यांच्यावर टीका केली. सुषमा अंधारे म्हणाले, “अहो दमानिया, जरा दमानं घ्या की.. किती तो प्रसिद्धीझोतात राहण्याचा सोस. कधीतरी पूर्ण, महत्त्वाचं म्हणजे अधिकृत माहिती घेत चला. ब्रॉडकास्टिंगवर टाकलेल्या मेसेजचा अर्थ काय घ्यायचा? तुम्ही माझ्या PR म्हणून काम करत आहात की, ठरवून ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे?” असा प्रश्न सुषमा अंधारेंनी विचारला.
सुषमा अंधारेंच्या या ट्वीटला अंजली दमानिया यांनीही लागलीच उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, केवळ आडनावाने तुम्ही मला संबोधता? छान. असो. मला तर ते पण करता येणार नाही. कारण केवळ अंधार आहे. खरंतर अशी भाषा वापरायला मला आवडत नाही, पण तुम्ही जे शब्द वापरले, त्यावर वाईट वाटले. मला खात्रीशीर माहिती अगदी, फेब्रुवारी महिन्यात मिळाली होती, की तुम्ही अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटला होतात आणि त्यांच्या पक्षात जाणार होतात. हे खरे आहे की नाही ह्यावर खरं उत्तर द्याल का? बातमी करायची असती तर तेव्हाच केली असती. पण तुम्ही कुठेही गेलात तरी मला काय फरक पडतो, म्हणून बोलले नाही. तुम्ही कुठल्याही पक्षात जाणार असाल तर नक्कीच जा, तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा. आणि हो प्रकाशझोतात यायची मला गरज नाही. प्रकाशझोतात ज्यांना यायचं असतं ते वाट्टेल ते करतात… त्यासाठी एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांबद्दल वाट्टेल ते बोलतात आणि मग त्याच पक्षात जाऊन नेत्या बनतात, हे मला ह्या जन्मी जमणार नाही. तुमच्या माहितीसाठी, काल एका चॅनलने बातमी ट्वीट केली की ठाकरे गटातील कोणीतरी अजित पवार गटात जाणार, ह्यावर मी फक्त माझ्या वैयक्तिक media broadcast च्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिहिलेला हा एक प्रश्न होता. तो तुम्हाला कोणीतरी पाठवला.”
अंजली दमानिया यांनी दिलेल्या या सविस्तर उत्तरानंतरही सुषमा अंधारे यांनी पुन्ह एक्सवरून पोस्ट केली. त्या म्हणाल्या, “दमानिया तुम्ही आडनाव बघून अजेंडे चालवता हे वास्तव आहे. ठाकरे–पवार यांना लक्ष्य करताना नागपूर आणि परिसरातील फडणवीस बावनकुळे मुनगुंटीवार यांच्यावर तुमची वक्रदृष्टी का नसेल? असो, ज्यांच्या पे रोलवर काम करता त्यांच्याकडून माहिती नीट घ्या. चुकीच्या बिळात हात घातला तर दंश महागात पडेल..!”
जाहीरपणे एवढी टीका-टीप्पणी झाल्यानंतरही दोघी शांत बसल्या नाहीत. सुषमा अंधारेंच्या या ट्वीटवर अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा उत्तर दिले. त्या म्हणाल्या, “ठाकरे, पवार, फडणवीस, मुनगंटीवार, बावनकुळे, ह्या सगळ्यांना पाहून घेऊच, पण प्रश्नाचे उत्तर का बरं दिले नाहीत?
१) अजित पवारांच्या घरी गेला होतात की नाही, आणि
२) पक्ष प्रवेश करणार होतात की नाही” या दोन प्रश्नावर अंजली दमानिया ठाम राहिल्या आहेत.
त्यांच्या या प्रश्नावर सुषमा अंधारे म्हणाल्या, “बाई आपण अशक्य मूर्ख प्रांतात आहेत. फुकट फौजदारकी तुमच्याजवळ राहू द्या. तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तुम्ही कुणी तीसमार खान नाहीत. तुम्ही कुणाच्या पे रोलवर काम करता हे आधी स्पष्ट करा. जमल्यास अमृता फडणवीसांनी अनिक्षा जयसिंगानीच्या विरोधात का FIR का केली यावर अक्कल पाजळा.”
दरम्यान, अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे यांच्यातील हे ट्वीटयुद्ध इथंच थांबतंय की लांबत जातंय हे आता पाहावं लागेल.