वाळूच्या टिप्परने गणेशला शंभर फूट फरफफटत नेले
हिंगोली : उद्याच्या रविवारी लग्न… घरात देव कार्याची लगबग.. पत्रिकांचे वाटप, निमंत्रणेही पोचलेले…जवळची बरीचशी पाहुणे मंडळी दाखलही झालेली.. लग्नघरी सनई-चौघड्यांचे मंजूळ सूर ऐकू येत असतानाच अचानकपणे एक वार्ता येऊन धडकते… भूकंप होऊन सारं नष्ट व्हावं तशी ! कापडसिंगी (ता. सेनगाव) येथील तनपुरे कुटुंबाच्या घरात घडलं. तनपुरे यांच्या घरातील गणेश या तरुणाच्या अपघाती मृत्यूची खबर आली आणि अवघे कुटुंब आणि गाव आनंदाच्या डोहातून शोकसागरात बुडाले.
गणेश उत्तमराव तनपुरे (वय २५) या तरुणाचा टिप्परने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की टिप्परने दुचाकीवरील गणेशला शंभरफूट फरफटत नेले. गणेशचा विवाह जिंतूर तालुक्यातील काजळ पिंपळगाव येथील मुलीशी रविवारी होणार होता. शुक्रवारी देवकार्याचा कार्यक्रम असल्याने आजोबाला (आईचे वडिल) आणण्यासाठी सेनगाव तालुक्यातील वाघजाळीला जात असताना पहाटे पाचच्या सुमारास आजेगाव टी पॉईंटवर भरधाव वाळूच्या टिप्परने त्याच्या दुचाकीला धडक देऊन सुमारे शंभर फूट फरफटत नेले.
यात दुचाकीस्वार गणेशचा जागीच मृत्यू झाला. लग्नाच्या अक्षता पडण्यापूर्वीच गणेशचा मृत्यू झाला. या घटनेने कापडसिंगी गावावर शोककळा पसरली आहे. गणेशचे लग्न रविवारी (२३मार्च) जिंतूर तालुक्यातील काजळ पिपळगाव येथील मुलीशी ठरले होते. आजेगाव टी पॉईंटवर समोरून येणाऱ्या वाळूच्या टिपरने गणेशच्या दुचाकीला धडक दिली आणि सुमारे शंभर फूट दूर फरपटत नेले. त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपस्थित काही मंडळीं घटनास्थळी जमली व त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलीस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक नितीन लेनगुळेसह, यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतांच्या मोबाईलवरून त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. पोलिसांनी मृत गणेशचा मृतदेह गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला आहे. पोलिसांनी आता आजेगाव येथील टी पॉईंट वरील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरवात केली आहे.
नातेवाईकांचे आंदोलन, चालक ताब्यात
याप्रकरणी टिप्पर चालकास तत्काळ अ्टक करावी, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख (उबाठा) संदेश देशमुख, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे गजानन कावरख व मृत गणेशच्या नातेवाईकांनी गोरेगाव पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. घटनेचे गांभीर्य आेळखून अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी ठाणे गाठले. त्यांनी टिप्परचालकाचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले. पोलिसांनी टिप्पर व चालक अभिजित सरकटे यास ताब्यात घेतले. पळशी-आजेगाव मार्गे वाळू खाली येताना गणेशच्या दुचाकीला पाठीमागून धडक बसल्याचे चालक सरकटे याने कबूल केले.