अहिल्यानगर : तरुणाईच्या भावनांचा विस्फोट होऊ न देण्याचे सामर्थ्य साहित्य व कलेमध्ये आहे. त्यातून जातीपातीच्या भिंती दूर करत माणसे जोडली जातात. त्यामुळेच तरुणांना साहित्य व कलेकडे वळवण्याच्या उद्देशाने युवा साहित्य व नाट्य संमेलने आयोजित केली जात आहेत. संघर्ष व अस्तित्वाच्या नादात जगणे हरवू नका. आभासी जगात जगू नका, तंत्रज्ञानाच्या जगात माणूसपण हरवू नका, असा सल्ला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी दिला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची सावेडी उपनगर शाखा व न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य व नाट्य संमेलनाचे उद्घाटन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष जोशी यांच्या हस्ते आज गुरुवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष अभिनेत्री गौरी देशपांडे, स्वागताध्यक्ष डॉ. प्रशांत भालेराव, आमदार संग्राम जगताप, महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे, सहसचिव मुकेश मुळे, सीताराम खिलारी, जयंत वाघ, संमेलनाचे निमंत्रक जयंत येलूलकर, डॉ. सुधा कांकरिया आदी उपस्थित होते.
अभिनेत्री गौरी देशपांडे म्हणाल्या, ‘युवा ही समाजात विधायक बदल घडवणारी शक्ती आहे. ही शक्ती वास्तवापासून दूर जात जीवघेण्या स्पर्धेत स्वत:ला हरवून बसली आहे. त्यामुळे आयुष्यात हरलो, असे मानून नैराश्यात जात आहे. बंद पाडलेले विचारचक्र पुन्हा सुरू करण्याचे बळ साहित्य, नाट्य व कलेत आहे. म्हणून या जीवघेण्या स्पर्धेत एखादा छंद व कला जोपासा.’
आमदार संग्राम जगताप म्हणाले, ‘समाजमाध्यमाच्या महाकाय वेढ्यातून मुक्त होण्यासाठी साहित्य व कला जोपासणे हा एकमेव चांगला पर्याय आहे. महामंडळाने पुढील साहित्य संमेलन नगरला द्यावे. चळवळीतील कार्यकर्ते ते नक्कीच यशस्वी करतील.’
स्वागताध्यक्ष डॉ. प्रशांत भालेराव म्हणाले, ‘जगातील युवा पिढी गोंधळलेल्या मानसिक स्थितीत आहे. त्यामुळे तरुण पिढीने साहित्याला व कलेला आत्मसात करावे. साहित्य संमेलनासारखे उपक्रम तरुणांना वेगळे वळण व दिशा देणारे व्यासपीठ ठरेल.’ सुनीता पवार यांनी आगामी १०१ वे साहित्य संमेलन नगरमध्ये होण्याची केलेली मागणी विचारार्ह असल्याचे सांगितले.
जयंत येलूलकर यांनी प्रास्ताविक केले. ॲड. विश्वासराव आठरे, मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भाषणे झाली. नाट्य व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. प्रा. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य बाळासाहेब सागडे यांनी आभार मानले.