मी वेरुळचं कैलासनाथ मंदिर बघितल्यापासून  जगातील या आश्चर्यकारक वास्तूबद्दल खूप वाचत गेले, मी या मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास केला. ओदिशातल्या उदयागिरी गुंफांबद्दलच्या माझ्या संशोधनाच्या निमित्ताने मला प्रख्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. उषा भाटिया यांना भेटण्याची दुर्मीळ संधी लाभली. आमच्या चर्चादरम्यान त्यांनी मला भारतातील सगळ्या लेणी आणि शिल्पकामातून घडवलेल्या मंदिरांबद्दल माहिती दिली. माझं आणखी सुदैव म्हणजे मुंबईतल्या सीएसएमव्हीएस म्युझियममध्ये मला भारतातील लेणी-मंदिरांबद्दल अनेक पुरातत्त्वशास्त्रज्ञांकडून खूप काही ऐकण्याची संधी मिळाली. कैलास मंदिराबद्दल मिळालेली माहिती तुम्हाला सांगण्याचा माझा हा प्रयत्न आहे, ज्यायोगे आपल्या देशामध्ये भूतकाळात निर्माण झालेल्या या विस्मयकारी वास्तूपासून भारतीयांना प्रेरणा मिळेल.

जगातील काही आश्चर्यकारक स्थापत्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या वेरुळ मंदिराला किंवा कैलास मंदिराला स्थापत्यकलेतलं एक शिल्प म्हटलं जातं; कारण ते एका दोनशे फूट लांब, दीडशे फूट रुंद आणि १०० फूट उंच अशा खडकातून कोरून काढलेलं आहे. मंदिरबांधणीचे कडक निकष लावून हा खडक निवडण्यात आला. कारण, तो कोणतीही चीर, स्तर, पांढऱ्या रेषा आणि तडे नसलेला निर्दोष खडक होता. खरं तर हा महाकाय दगड आणखी एका त्याहूनही महाकाय दगडातून फोडून काढलेला आहे. हा विशाल दगडही बाजूला दिसतो. आश्चर्य म्हणजे या मंदिराचं स्थापत्य करणाऱ्यांना हजार वर्षांपूर्वी भूगर्भशास्त्राचं सखोल ज्ञान होतं. म्हणूनच ते एवढा मोठा निर्दोष दगड शोधू शकले. यात रस असलेल्यांना माहीतच असेल की सहय़ाद्री पर्वत तयार झाले आहेत डेक्कन ट्रॅपमधून. या प्रकारच्या खडकांत निर्दोष खडक मोठय़ा संख्येने सापडतात आणि म्हणूनच सहय़ाद्रीमध्ये गुंफामंदिरे, चैत्य, शिल्पकाम, सुंदर रचना असलेले मंच आणि अशा अनेक आश्चर्यकारक वास्तू आढळतात. सहय़ाद्री पर्वतरांगा आता युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केल्या आहेत, त्या यातील खडकाळ डोंगरांतील वास्तूंमुळे आणि तिथे आढळणाऱ्या वनस्पती आणि प्राणिवैविध्यामुळे. कैलास मंदिर जेथे आहे ती वेरुळ लेणी युनेस्कोने (१९८३ मध्ये) जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केले आहे.

अजिंठा-वेरुळला दर वर्षी दिलेल्या भेटींमध्ये मी अजिंठा लेण्यांमधील फ्रेस्को काम बघितलं आणि वेरुळचं कैलासनाथ मंदिरही बघितलं. फ्रेस्कोसाठी निवडलेल्या प्रत्येक रंगाबद्दल आणि मंदिराच्या प्रत्येक वैशिष्टय़ाबद्दल तज्ज्ञांनी खूप काही उलगडून सांगितलं. त्यानंतर मी या लेण्यांबद्दल बरंच काही वाचलं आणि यातून एक दृष्टी मिळाल्याचा आनंद मला झाला. कारण, माझ्यासाठी हा अनमोल ठेवा होता. अर्थात मी अनेक पुस्तकं वाचूनही मला या लेण्यांचे नेमके निर्माते किंवा कलावंत कोण याबद्दल काहीच सापडलं नाही. हजारो वर्षांपूर्वी हे अजोड काम करणाऱ्या महान शिल्पकार आणि रचनाकारांबद्दल अजूनही काहीच माहिती नाही. एका महाकाय दगडातून एक विशाल दगड फोडून काढून पुन्हा त्यातून कोरून काढलेलं असं हे जगातलं एकमेव मंदिर असावं, पण त्याचे निर्माते आपल्याला माहीत नाहीत हे खरं तर कीव करण्याजोगं आहे! गेली अनेक दशकं संशोधन करूनही आजचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ वेरुळ कैलास मंदिराची स्थापत्यशैली किंवा निर्मितीबाबत सांगताना केवळ यातील काही शिलालेखांच्या हवाल्याने काही ऐतिहासिक घटनांचे संदर्भ देऊ शकतात. अर्थात तरीही कैलास किंवा कैलासनाथ मंदिर हे केवळ अजिंठा-वेरुळ लेण्यांमधीलच नाहीत तर भारतातील अनमोल रत्न आहे. एका दगडातून कोरून काढलेलं हे मंदिर म्हणजे भगवान शंकराचं हिमालयातील निवासस्थान असलेल्या कैलास शिखराची प्रतिकृती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या दृष्टिक्षेपात ही महाकाय अखंड वास्तू मंदिरांचा एक बहुमजली समूह असल्यासारखी भासते. मात्र, जवळून बघितल्यावर लक्षात येतं की ही वास्तू एका निर्दोष खडकातून खोदून काढली आहे आणि अथेन्समधल्या पार्थेनॉनच्या दुप्पट जागेत पसरलेली आहे. असं म्हणतात की हे मंदिर प्रथम सापडलं तेव्हा त्यावर पांढरं प्लास्टर केलेलं होतं, अर्थातच ते हिमाच्छादित कैलास शिखरासारखं दिसावं या उद्देशाने. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर वेरुळ लेणी आहेत.

वेरुळ लेणी हे जागतिक वारसास्थळ आहे (१९८३) आणि उपखंडातील दगडातून खोदून केलेल्या स्थापत्यकलेतील परिपूर्णतेचं प्रतिनिधित्व करणारी वास्तू आहे. एका उभट खडकातून कोरून काढलेली ३४ लेणी इथे आहेत. यात खडकातून खोदून काढलेली बौद्ध, हिंदू आणि जैन मंदिरं आणि विहार आहेत. हे राष्ट्रकूट राजवटीत म्हणजे इसवीसन ७३५ ते ९३९ या काळात बांधण्यात आली आहेत. या समूहात १२ लेणी बौद्ध लेणी (क्रमांक १ ते १२), १७ हिंदू लेणी आहेत (क्रमांक १३ ते २९) आणि पाच जैन लेणी आहेत (क्रमांक ३०-३४). ही लेणी एवढय़ा जवळजवळ आहेत याचा अर्थ भारताच्या इतिहासामध्ये या तिन्ही धर्मात सौहार्द होते. १५व्या क्रमांकाचं लेणं म्हणजे कैलास मंदिर. बहुतेक संशोधकांच्या मते थोडेफार शिलालेख आणि अन्य तुरळक स्रोत बघता, कैलास मंदिर आणि लेणीसमूह राष्ट्रकूट राजांनी बांधला आहे. दांतीदुर्गापासून सुरू झालेली (इसवीसन ७३५ ते ७५५) राष्ट्रकूट राजवट इसवीसन १०००च्या आसपास लयाला गेली. दांतीदुर्ग राजाच्या नावाचा उल्लेख १५व्या लेण्यातल्या नंदीदालनातल्या एका शिलालेखात आहे. यात दशावतारांची अर्थात विष्णूच्या दहा अवतारांची शिल्पंही आहेत. गुंफामंदिरांची कला राष्ट्रकूट राजवटीतच बहरली आणि महाराष्ट्राचं, देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील राज्याचं एक वैशिष्टय़ झाली. या संपूर्ण भागातून सहय़ाद्रीच्या पर्वतरांगा जातात. दांतीदुर्ग राजानंतर कृष्ण  (इसवीसन ७५७-७७२) गादीवर बसला. त्यानेच कैलास मंदिर बांधलं असावं, असं समजलं जातं. त्यानंतर मुख्य मंदिराच्या आजूबाजूला अनेक मंदिरं उभी राहिली. गोविंद (इसवीसन ७९४ ते ८१४) हा या राजवटीतला सर्वात महान राजा समजला जातो. त्याने सर्व शत्रूंचं पारिपत्य करून मोठं साम्राज्य उभं केलं.

दहाव्या शतकाच्या अखेरीस गुंफा मंदिरांची कला लयाला गेली आणि नवीन बांधकाम करून मंदिरं उभारली जाऊ लागली. नंतरच्या काळात अमोघवर्षांसारख्या राजांनी लेण्यांमध्ये मंदिरं बांधण्यात योगदान दिलं.

जगभरातल्या पुरातत्त्वशास्त्रांना विस्मय वाटणारी बाब म्हणजे ही विशाल लेणीमंदिरं केवळ मानवी हातांनी बांधण्यात आली आहेत! कैलास मंदिराची विशालता आणि परिपूर्णता बघता ते कसं बांधलं असेल याची कल्पना करणंही माणसासाठी आव्हानात्मक आहे. यामध्ये एकूण दोन लाख टन दगडांवर कोरीवकाम करण्यात आलं आहे आणि कदाचित १०,००० कामगार यासाठी शंभर र्वष काम करत असावेत. या मंदिराशिवाय लेण्यांमध्ये प्रवेशद्वार, अंत:पुरं, सभागृह, मनोरा असं सगळं आहे. बहुतेक बांधकामांमध्ये जमीन शोभिवंत आकृती तसेच चिन्हांनी झाकून टाकलेली आहे.

हे मंदिर एका सज्जाला पुलाच्या मदतीने जोडलेले आहे. स्थापत्यशास्त्रातील सौंदर्याचा अभ्यास ज्यांनी केला आहे त्यांच्या मते, मानवी मन, हृदय आणि हात यांनी एकीने व सौहार्दाने काम केलं तर अविश्वसनीय कलाकृती जन्म घेऊ  शकते याचं हे मंदिर हे प्रतीक आहे. अनेक शतकं लोटली तरी कैलास मंदिर सुरक्षित आहे. त्यातल्या काही चिन्हांचं काळाच्या ओघात नुकसान झालं आणि वेळोवेळी दुरुस्तीही करण्यात आली. इंदूरच्या पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांनीही कैलास मंदिरात दुरुस्तीची कामं करून घेतली होती. मुघल राजा औरंगजेबाची औरंगाबाद ही राजधानी असूनही या शहरापासून केवळ ३० किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंदिर सुरक्षित राहिलं हे तर आश्चर्यच समजलं जातं. कारण औरंगजेबाने हिंदू, बौद्ध आणि जैन प्रार्थनास्थळांचा विध्वंस घडवून आणला होता.

१९व्या शतकात भारतात ब्रिटिशांची राजवट असताना वेरुळ दुर्लक्षित होते. मंदिरात कोणीही पूजा-प्रार्थना करत नव्हतं. मूर्तीचंही घुसखोरांमुळे किंवा काळाच्या ओघात नुकसान झालं होतं. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडफार प्रयत्न केले, तरी या लेण्यांचं वैभव परत आणून देण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९६०च्या दशकात. या काळात अजिंठा-वेरुळचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळं म्हणून प्रसार सुरू झाला होता. युनेस्कोने १९८३ मध्ये वेरुळ लेण्यांचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला, तेव्हापासून ही स्थळं जतन करण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू झाले. आज अनेक दशकांनंतरही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग जतनीकरणाचं काम सातत्याने करतच आहे. यातून या मंदिराची नवीन रूपं समोर येत आहेत आणि प्राचीन भारतातलं हे आश्चर्य बघण्यासाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या समूहांना इथे येणं सोपं होत आहे. वेरुळ लेण्यांतलं कैलास मंदिर हे एकाच दगडातून कोरून काढलेलं जगातलं या आकारमानाचं एकमेव बांधकाम आहे. भारतातील राजे व कलावंतांना हजारो वर्षांपूर्वीची दृष्टी यातून दिसून येते! अलीकडेच सह्य़ाद्रीच्या संपूर्ण पर्वतरांगा किंवा पश्चिम घाटाला युनेस्कोने जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. ही खडकाळ पर्वतांची रांग देशाच्या पश्चिम कडेला एक हिरवागार पट्टा होऊन पसरली आहे. हे पर्वत बेसॉल्ट खडकांतून किंवा डेक्कन ट्रॅपमधून तयार झालेले असून हा खडक कोरीवकाम किंवा शिल्पकलेसाठी अनुकूल समजला जातो. हे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या स्थापत्यकलेच्या अनेक आश्चर्यातून सिद्ध झालं आहे. कैलास मंदिर हा भारतातील गुंफा मंदिरातला एक अलंकार आहे आणि कलेवर प्रेम करणाऱ्या देशातल्या प्रत्येक नागरिकाने या मंदिराला भेट दिलीच पाहिजे.

महाराष्ट्रातली आणखी काही महत्त्वाची लेणी आणि लेणीमंदिरं पुढीलप्रमाणे: १. घारापुरी लेणी २. महाकाली लेणी ३. भाजाची लेणी ४. कान्हेरी लेणी ५. मंडपेश्वर लेणी ६. धाराशिव जैन लेणी ७. पांडवगड लेणी ८. कार्ला लेणी ९. भेडसे लेणी १०. पाताळेश्वर लेणी ११. लेण्याद्री १२. औरंगाबादमधील बौद्ध लेणी. ही झाली काही प्रसिद्ध लेणी. फारशी माहीत नसलेली शेकडो लेणी महाराष्ट्रात आहेत.

विशेष माहिती – भारतात एकूण ३५ जागतिक वारसास्थळं आहेत. यातील २७ सांस्कृतिक, सात नैसर्गिक तर एक मिश्र स्वरूपाचं आहे.

 

भाषांतर – सायली परांजपे

विमला पाटील

sayalee.paranjape@gmail.com

chaturang@expressindia.com