18 September 2020

News Flash

एका लग्नाची गोष्ट

तो थांबला. तिच्या डोळ्यात त्याला क्षणभर वेदना दिसली.

तो थांबला. तिच्या डोळ्यात त्याला क्षणभर वेदना दिसली. तिला जवळ घेऊन वर्षे लोटली आहेत याची त्याला जाणीव झाली. तिची अवस्था त्याला कोंडलेल्या मांजरासारखी केविलवाणी वाटू लागली. तिला बोचकारे काढू द्यावेत, भांडू द्यावं, पण घट्ट धरावं वाटू लागलं. कुणाला असं घट्ट जवळ घेतलं की त्याला भांडता येत नाही. तलवार फिरवायलाही दोघांत अंतर लागतं! ते अंतर शशीनं मिटवून टाकलं.

कार्ल युंग विसाव्या शतकातला एक विख्यात मनोविश्लेषक. त्याच्या मते, प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष दडलेला असतो अन् प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री! हा सिद्धांत वाचल्याबरोबर मला आठवला तो शशी! बालपणीचा शेजारी. त्याचे वडील शाळेचे मुख्याध्यापक. जाड भुवया, भेदक डोळे अन् कडक शिस्तीच्या या हेडमास्तरच्या पोटी हळवा, गरीब स्वभावाचा थोडा भित्रा असा शशी कसा जन्मला कोण जाणे!

शशीमध्ये एक प्रबळ स्त्री-मन होतं. हातावर हात धरून गुडघ्यात थोडं वाकून उभं राहण्याची पद्धत, मृदू सोशीक आवाज, खांदे ओघळलेले. शशी डावखुरा होता. त्याचं हस्ताक्षर कमालीचं सुंदर होतं. रांगोळीचे एकसारखे ठिपके पडावेत तशी कागदावर अक्षरे पडायची त्याच्या लेखणीतून. गणिताशी वाकडं, पण कलेत हुशार होता. क्रेपच्या रंगीत कागदांची फुले तयार करणं, चित्रकला, हस्तकला यात प्रवीण. उसवल्या बाहीला इतके एकसारखे टाके घालायचा, जणू मशीनची शिलाई! मैदानी खेळांचं शशीला वावडं. तो मुलींच्या घोळक्यातच खेळायचा. त्यामुळे आम्हा मित्रांच्या लेखी तो मुलींत मुलगा चोंबडाच होता. पुरुषप्रधान परंपरेमुळे आपली भाषाही तशीच, त्यामुळे ‘बायकी’ वागणारा शशी तसा हेटाळणीचाच विषय होता. मात्र आम्ही असं चिडवलं, की शशी फक्त दुखावल्या डोळ्यांनी आमच्याकडे बघायचा. त्याला शिव्याही येत नसाव्यात!

आम्ही ‘तारुण्यात’ प्रवेश केला तसं शशीचं वागणं अधिकच खटकू लागलं. मुली त्याच्या सुंदर अक्षराला भाळून सहज ओळखीच्या होऊन जायच्या, हा त्यांना ताई करून टाकायचा! धसमुसळे खेळ टाळणाऱ्या शशीला तशातच खगोलशास्त्राची गोडी लागली. फिजिक्स शिकवणाऱ्या घुनागेसरांनी खगोलशास्त्रावर पुस्तकं लिहिली होती, तो त्यांचा आवडता विद्यार्थी होऊन गेला. घुनागेसरांची मुलगी नीला खरं तर ‘टॉमबॉइश’ म्हणून प्रसिद्ध, तिची शशीची ओळख होऊन प्रेमात रूपांतर होईल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण तिचे नोट्स सुंदर हस्ताक्षरात कॉपी करून देणं, तिच्यासाठी प्रॅक्टिकलला महत्त्वाचं टेबल राखून ठेवणं, (हा तिचा स्कर्ट इस्त्री करून देतो अशी मुलांनी हूल उडवली होती) या सर्व ‘बायलीश’ सेवेमुळे नीलाचे हृदय त्याने जिंकून घेतले (‘की देवीचा प्रसाद म्हणून ग्रहण केले?’, एक वाह्यात मित्र). शशीचा जाड भुवयाचा हेडमास्तर बाप कमालीचा लोभी, त्याने शशीचे लग्न एका श्रीमंत वकिलाच्या चष्मीश मुलीशी पंधरा हजार रुपये हुंडय़ाच्या बदल्यात ठरवलं होतं, मात्र शशीने तो बेत हाणून पाडल्याने ते धुमसत राहिले.

शशी तेव्हापासून कुटुंबातून थोडा तुटतच गेला. शशीची आई नवऱ्याच्या कडक शिस्तीत दबलेली, तिने नवऱ्याच्या छडय़ाच तेवढय़ा खाल्ल्या नाहीत, एरवी सगळा संसार अंगठय़ात कान धरूनच झाला. तिचं मन शशीसाठी तुटायचं. चार मुलांत शशी ‘कुरूप वेडे पिल्लू’ आहे असं तिला वाटायचं. थोरल्याला शासकीय नोकरी मिळाली, त्याची सून कजाग निघाली. दुसरा सिंगापूरला जाऊन धनाढय़ झाला, त्याची बायको श्रीमंत पतीची राणी म्हणून तोऱ्यात. तिसऱ्यानं बापाच्या शिस्तीतून सुटका करून घेत थेट नेव्हीत नोकरी धरली, अन् तिकडेच एका पंजाबी पोरीशी लग्न उरकून घेतले. उरला शशी. सासऱ्याच्या मनाविरुद्ध घरात आलेल्या सुनेशी त्याने संसार सुरू केला. सहा खोल्यांच्या घरात शशीला शेवटची चिंचोळी खोली देण्यात आली. शशीने समंजसपणे तेवढीच खोली कमालीची सुबक, नेटकी सजवली. मात्र नीला खवळली. नवऱ्याच्या पडखाऊ स्वभावाबद्दल तिच्या रोज तक्रारी सुरू झाल्या. सारे दीर वरचढ, जावा तोऱ्यात, सासरा हिटलर आणि सासू स्वत:च पीडित, नीला त्या दहाबाय वीसच्या खोलीत कोंडल्या मांजरासारखी झाली. तिचे पंजे शशीचं रक्त काढू लागले. ‘पुरुषासारखे पुरुष तुम्ही, काही बोला, हक्क मागा आपला!’ तिचं एकच म्हणणं. तेही गैर होतं असं नाही, पण ते शशीच्या रक्तात नव्हतं, हे तिला कळूनही वळत नव्हतं.

एव्हाना त्यांना दोन मुलंही झाली. थोरला मुलगा नीलावर गेला होता, तोही बापाला येता-जाता डाफरायचा. धाकटी मुलगी मात्र शशीचा जीव की प्राण. तिलाही बापाचा लळा. मुलांचं संगोपन शशीनेच केलं. नीलानं त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. तिचं मोलाचं तारुण्य शशीच्या वागण्यानं त्या खोलीत कुजून गेलं होतं. तिच्या मनात आता नवऱ्याबद्दल नुसती नाराजी नव्हती, त्याची जागा तिरस्काराने घेतली होती.

दरम्यान, हेडमास्तर बापाचा मृत्यू झाला. इस्टेटीचे वाटे सुरू झाले. त्यात स्वत:चे स्वतंत्र बंगले बांधलेल्या भावांनीही हिस्से घेतले. शशीच्या वाटय़ाला उरली तीच खोली! नीला आता या पडखाऊ  संसाराला कंटाळली. तिने घटस्फोटाची भाषा सुरू केली. तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा शशीही हादरला. पण घटनांची अपरिहार्य परिणती कुणालाच थांबवता येत नाही. नीला माहेरी निघून गेली. मुलगा होस्टेलला गेला. मुलीनं मात्र बापाबरोबरच राहायचं ठरवलं. तिने बापातली स्त्री, आई ओळखली होती. ती नीलाला समजली नव्हती, ती मुलीला समजली.

आता शशीतल्या स्त्रीचं रूपांतर एका खंबीर आईमध्ये झालं. त्यानं कंबर कसून नोकरी, मुलीची शाळा, घरकाम अशा साऱ्या आघाडय़ा सांभाळल्या. मुलीच्या संगोपनात, संस्कारात कुठलीही कमतरता ठेवली नाही. जवळच्या छोटय़ा गावात बदली करून घेतली. तिथे टुमदार बंगली बांधली. मुलीला उत्तम कोर्सला प्रवेश दिला. मुलगी वयात आली. शशीने मनाशी काही एक निर्णय घेतला. असाच एके दिवशी नीलासमोर जाऊन थडकला. तिच्या बटांना रुपेरी वर्खाची झांक आली होती. चेहरा थिजला होता. दहा वर्षे मनात खदखदणारी गाऱ्हाणी थिजली होती. शेवटी शशीनेच तिच्या प्रश्नार्थक चर्येला उत्तर दिलं!

‘‘आपल्या पोरीला आईची गरज आहे, मला तुझी. मी हक्कासाठी भांडलो नाही, पुरुषासारखा पुरुष असून भांडलो नाही असं वाटतं नं तुला? फक्त आक्रमकता म्हणजे पौरुष असं वाटतं का तुला? असेलही. पण तेच पुरुषत्व असेल तर ते नाहीय माझ्यात. माझ्यात माझी सोशीक, हळवी आई उतरलीय. माझ्या बोटांना नखंच उगवली नाहीत. मला कुणाशी भांडावं वाटत नाही. काय मिळतं भांडणं करून? हक्कासाठी भांडून माणसं तुटत असतील तर काय उपयोग त्याचा? ही माझी विचारसरणी चुकीची असेल, तर तीच पोरीच्या मनात झिरपता कामा नये. तू हवी आहेस तिला हे शिकवायला!’’

‘‘म्हणजे तुम्ही बापाचे कर्तव्य पार पाडणार नाहीच?’’ नीलाला आता कंठ फुटला.

‘‘मी प्रयत्न करीन, पण मी होऊ  शकलो नाही, तर तू हवी आहेस तिचा बाप व्हायला. मला नाही होता येणार. मर्यादा आहे माझी ती, अन् मी ती ओळखली आहे. माणसाच्या ग्रहांसारख्या बंदिस्त कक्षा असतात. स्वभावाचे परीघ असतात. तुझ्या वडिलांच्या पायाशी बसूनच शिकलो आहे मी ते खगोलशास्त्र. त्या कक्षा तोडल्या तर बाहेर फेकल्या जातील ते, अंतराळात. तू तुझी कक्षा सांभाळ, मी माझी. कुणी कुणाभोवती उपग्रह होऊन फिरावं असं नाही. पण..’’ तो थांबला. तिच्या डोळ्यात त्याला क्षणभर वेदना दिसली. तिला जवळ घेऊन वर्षे लोटली आहेत याची त्याला जाणीव झाली. तिची अवस्था त्याला कोंडलेल्या मांजरासारखी केविलवाणी वाटू लागली. तिला बोचकारे काढू द्यावेत, भांडू द्यावं, पण घट्ट धरावं वाटू लागलं. कुणाला असं घट्ट जवळ घेतलं, की त्याला भांडता येत नाही. तलवार फिरवायलाही दोघांत अंतर लागतं! ते अंतर आज शशीनं मिटवून टाकलं.

गोष्टीचा शेवट ‘राजाराणी सुखाने नांदू लागले’मध्ये होतो. चित्रपटाचा शेवट हातात हात घेऊन गाणी म्हटल्याच्या दृश्यात होतो. शशीची कहाणी तीन तासांचा चित्रपट नव्हती. एवढय़ात तिला शेवटही नव्हता. विठ्ठलाची विठूमाऊली व्हायला युगे अठ्ठावीस लागली. आयुष्यातल्या स्त्रीत्वाचा शोध असा कधीतरी सुरू होतो, आणि निरंतर चालू राहतो. दरम्यान, आयुष्य कधीतरी संपतं.

पण शोधाला कुठे शेवट असतो! तो ज्याचा त्याने शोधायला हवा, नाही?

डॉ. नंदू मुलमुले

nandu1957@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2017 12:24 am

Web Title: nandu mulmule loksatta chaturang marathi articles
Next Stories
1 विभ्रमाची वारी
2 यू टर्न!
3 शंभर पायांची गोम!
Just Now!
X