News Flash

मॅजिक ऑफ टेक्नॉलॉजी

आई-बाबांची पिढी ना या सगळ्या गॅजेट्सला तशी मागासच आहे. पण सगळयाचं कुतूहल एकदम जबरदस्त.

हातातला स्मार्टफोन, त्यातले वेगवेगळे अ‍ॅप्स वापरणं ही तरुणाईसाठी रोजचीच बात. पण घरातले आई-बाबा हे स्मार्ट फोन वापरायला घेतात आणि त्यांची सॉलिड तारांबळ उडते..

‘तसं नसतं करायचं, तुम्हाला कळत नाही. जरा नीट ऐका माझं.. एकतर अर्धवट माहिती आणि मी सांगितलेलं ऐकायचं नसतं तुम्हाला.. अरे पुन्हा तेच.. तुम्ही इम्पॉसिबल आहात.’ रविवारी आमच्याकडे बहुतेकदा हे संभाषण कानी पडतं. कारण दादा घरी असला की आई-बाबांची तंत्रज्ञानविषयक ज्ञानपिपासा मॅक्झिमम लेव्हलला जाऊन पोचते आणि मग मोबाइलपासून सुरू होणारा सिलसिला मिक्सर किंवा मायक्रोवेव्हपर्यंत असा कुठेही थांबू शकतो. बिच्चारा दादा. रविवार सुट्टी नसून सक्ती वाटत असेल त्याला. आई बाबांनी ज्ञानार्जनासाठी माझ्याकडे येण्याचा मार्ग तर मी आधीच बंद करून टाकला. त्याला कारण आईचे आधीचे प्रयत्न.  ‘अगं, मला जरा हा नंबर कसा सेव्ह करायचा ते दाखवतेस का?’ अगदी नीट रीतसर मी तिला दाखवले पण त्यातही तिच्या हजार शंका.. शेवटी कंटाळून मीच नंबर सेव्ह करून दिला. पुन्हा काही दिवसांनी तीच शंका. ‘हो, दाखवते थांब. आलेच.’ असं म्हणून मी सटकलेच. हळूहळू मग ही जबाबदारी दादावर सरकवायला लागले. ‘हे ना दादाला नीट माहितेय. त्याच्या फोनमध्ये पण असंच आहे. दादा दाखव रे.’ माझी आग्ऱ्याहून सुटका..

आई-बाबांची पिढी ना या सगळ्या गॅजेट्सला तशी मागासच आहे. पण सगळयाचं कुतूहल एकदम जबरदस्त. दादाने एखादी गोष्ट शिकवली की तेच करत बसतात, लहान मुलांच्या चेहऱ्यावरचं कुतूहल आई-बाबांच्या चेहऱ्यावर बघणं म्हणजे एक बेस्ट अनुभव असतो. तंत्रज्ञानाने आमूलाग्र बदल केलेत हे खरंच आहे, पण त्याने सगळ्यात मोठा बदल केला असेल तो म्हणजे पिढय़ांचे रोल बदलणे. या तंत्रज्ञानामुळे वीसपंचवीस  पावसाळे पावसाळे पाहिलेली पिढी आठ-दहा व्हर्जन्स अपग्रेड केलेल्यांकडून मार्गदर्शन घेते. एक्स्चेंज ऑफ रोल.. मॅजिक ऑफ टेक्नॉलॉजी ! आणि हे सगळ्यांच्याच घरोघरी. प्रत्येकजण असतो वेगवेगळ्या लेव्हल्सना. पण गेम तोच.

त्या दिवशी ऋचा वैतागून सांगत होती. ‘ही आई ना.. अगं तिला ना मी एसएमएस कसा पाठवायचा, वाचायचा ते शिकवलं. म्हटले की मला कॉल घेता नाही येणार तेव्हा मी एसएमएस पाठवला तर निदान वाचता तरी येईल तिला, पण आता ताप झालाय हा डोक्याला. अगं, कोणताही सण आला, काहीही ऑकेजन असलं की ही मला पण एसएमएस पाठवते. तेही सोफ्याच्या दुसऱ्या टोकाला बसून आणि पाठवून झाल्यावर विचारते, ‘मिळाला का?’ मी सांगितलं की अगं तुझ्या मत्रिणींना पाठव, मला काय पाठवतेस तर म्हणते वाच ना. बघ आता कसा मला नीट पाठवता येतो ते. बरं तू काकूंना अजून व्हॉट्सअ‍ॅप नाही शिकवलंस ते नाहीतर तुझं काही खरं नसतं, ट्रस्ट मी!”

असं झालं तर काय अनर्थ होईल या विचारातून मी कशीबशी बाहेर येत हळू आवाजात म्हटल, ‘सध्या मी आणि दादाने त्यांना त्या स्टेजपर्यंत पोहोचूच दिलं नाहीये, जरा हळूहळू चालू ठेवलंय. तरी ते म्हणत असतात मध्येच की ते व्हॉट्सअ‍ॅप का काय ते टाकून दे मोबाईलमध्ये. आम्ही तर कानाडोळा करतो. पण त्यांना कोण शिकवतं देव जाणे! रोज सकाळी पुष्पगुच्छांच्या फोटोबरोबर गुड मॉर्निगचा मेसेज आणि गुड नाईटचा मेसेज दररोज असतोच त्यांचा. आणि त्यात वरून सगळं मराठीत लिहायचं असतं त्यांना.. यात कहर म्हणजे या मेसेजचा त्यांना रिप्लायसुद्धा हवा असतो.. कित्ती ते मेसेज त्यांचे.

शंकर महादेवनना पिछाडीवर टाकून मी ब्रेथलेस होण्याचा रेकॉर्ड केव्हाच मोडला होता. साहाजिकच होतं ते. मनातली भडभड अशी सह अनुभवी समोरच बाहेर येणार ना.. तितक्यात आम्हा दोघींचा फोन वाजला आणि एक हताश उसासा सोडून दोघींनी एकमेकींकडे पाहिले. शाळेतल्या निबंधात का कधी ‘तंत्रज्ञान-एक शाप’ मध्ये हा मुद्दा मी लिहिला नाही याचे राहून राहून वाईट वाटले .

त्या दिवशी तर आईने गेमच केला. खूप दिवसांनी मी, आईबाबा आणि दादा सिनेमा पाहायला गेलो होतो. सिनेमा ऐन रंगत असताना शास्त्रीय संगीताची एक धून मोठय़ाने वाजायला लागली.. एक मिनिट ओळखीची वाटतेय मला ही. आइशप्पथ.. आईचा मोबाइल. थिएटरमधल्या सगळ्यांच्या नजरा समोरचा पडदा सोडून आमच्याकडे वळल्या. मी जवळजवळ खुर्चीच्या खाली लपण्याच्या मार्गावर होते. दादा तर ‘मी यांना बिलकुल ओळखत नाही’ या मोडमध्ये गेला. आणि आई.. बाकी दुनियेशी आपलं काय देणंघेणं या आविर्भावात निश्चलतेने पर्समध्ये आपला फोन शोधत होती. तोपर्यंत सिनेमाला आलेल्यांना शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला आल्याचा चांगलाच फील मिळत होता. फायनली साधारण १०-१५ वर्षांनी (मध्ये इतका वेळ गेला असावा असं मला खरंच वाटलं ) आईला फोन मिळाला आणि आता खरा सीन सुरू.. इतर कोणी म्हणजे आमच्या सारख्या साधारण लहान मुलांनी फोन पटकन बंद करून गुडूप केला असता आणि खजील होऊन सिनेमा पहिला असता, पण छे असं काहीच घडलं नाही उलट आईने तो कॉल रिसिव्ह केला, तोपर्यंत मी खुर्चीखालच्या जमिनीला दे माय धरणी ठाय म्हणून झालं होतं. दादा तर मला वाटतं चुपचाप सटकून गेला होता. आणि सिनेमाला आलेले बाकीचे लोक मला झोंबी ( ९े्रुी ) वाटायला लागलेले.. आमच्याकडे लाल डोळ्यांनी रोखून पाहणारे. ‘बोल गं नीतू, कसा काय केलास फोन? नाही गं, जरा बाहेर आलेले, करते तुला घरी गेल्यावर. हो ना गं. ते ठरवायचं बाकीच आहे अजून, बघ तुला कसा वेळ आहे ते.. हो चालेल अच्चा बाय. ‘नीतूचा फोन होता अहो, ते आमचं पिकनिकच..’ आता पाणी डोक्याच्या चार फूट वरून जात होतं आणि झोंबीसुद्धा चार फूट जवळ आलेले आमच्या .. मला लाइफ गार्ड बनणं भाग होतं. ‘आई नंतर सांग आता ते आणि दे तो फोन. बाबा तुमचा फोन सायलेंट वर आहे ना? मी शक्य तितक्या दबक्या आवाजात झोंबींना त्रास होणार नाही अशा रीतीने बोलले. थिएटरमधून बाहेर येताना मला तर लोकांच्या चेहऱ्यावर ‘यही है वह खुनी परिवार’ टाइप भाव दिसत होते या प्रसंगापासून मी तिकीट बघायच्या आधी या दोघांचे मोबाईल पाहते. एक मात्र आहे, आईबाबांना हे सगळं शिकायचं असतं. मग कधीतरी टच स्क्रीन मुळे कोणालातरी चुकून फोन लागतो, ब्लँक मेसेज जातो, मी एफ बी चेक करत असताना हळूच डोकावलं जाते. आम्हाला याबाबतीत बरंच माहिती आहे याचं त्यांना खूप कौतुकसुद्धा आहे. अर्थात आमचं चोवीस तास मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये घुसून बसण्याचं कारण मात्र त्यांना अजून उमगलेलं नाही. आम्हालाही नाही कळलंय खरतर.

तर त्या दिवशी आमच्यापेक्षाही स्मार्ट व्यक्ती घरी आली. आमची छकुली ताई.. रडत मुसमुसत. आईने तिला जवळ घेतले. छकुली ताई म्हणजे आमचं अपग्रेडेड वर्जन. मला जितकं तंत्रज्ञानामधलं कळतं त्यापेक्षा सव्वाशे पट जास्त तिला कळत असेल. पण आज मात्र ताई रडत होत्या. आईने जवळ घेतल्या घेतल्या ती अगदी बिलगलीच आईला. ‘आंटी, मम्मी ओरडली मला खूप. ‘का बरं, काय केलंस तू? होमवर्क पूर्ण नाही का केलास?’ आईने तिचे डोळे पुसत विचारले. ‘नाही, मी ना, मम्मा डेडाचे फोन लपवून ठेवले.’, ‘का ग?’ आम्ही दोघींनी आश्चर्याने विचारले. ‘ते ना घरी आले की फोनवरच चॅट करत बसतात. माझ्याशी बोलतच नाहीत. त्या दिवशी पण ना मला ए ग्रेड दिली टीचरने पण मम्मा काहीच बोलली नाही. लॅपटॉपवर काम करत बसलेली. मग मी दोघांचे पण फोन लपवले तर मला खुप्प्प ओरडली’ असा म्हणून तिने भोकाड पसरले. आणि पुन्हा मनात तरळून गेले एक्स्चेंज ऑफ रोल्स.. मॅजिक ऑफ टेक्नॉलॉजी!
प्राची साटम –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2016 1:18 am

Web Title: magic of technology
टॅग : Technology
Just Now!
X