करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. अलिकडेच अभिनेता सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबाला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्याच्यानंतर आता बिग बॉस मराठी 2 फेम अभिनेता अभिजीत केळकर यालादेखील करोनाची लागण झाली आहे. अभिजीतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
माझ्यात कोणतेही करोनाची लक्षणं नव्हती. मात्र चाचणी केल्यानंतर माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, असं म्हणत अभिजीतने ही माहिती दिली.
“नमस्कार, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली… माझी फक्त पाठ दुखत होती ह्या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हतं किंवा सर्दी,खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणही नव्हती… डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली जी पॉझिटिव्ह आली… त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे आणि आता माझी तब्येत उत्तम आहे… माझी बायको तृप्ती आणि राधा- मल्हार सगळे ठणठणीत आहेत… तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी असू देत धन्यवाद…”,अशी पोस्ट अभिजीतने शेअर केली आहे.
दरम्यान, आतापर्यंत कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस करोनाचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. तसंच गेल्या तीन ते चार महिन्यांपासून देशात लॉकडाउनदेखील सुरु आहे.