News Flash

‘या’ चित्रपटातून अजित वाडेकरांनी जपलं होतं क्रिकेटप्रेम

चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार अजित वाडेकरांच्या आठवणींना उजाळा

यशस्वी कर्णधार, दर्जेदार प्रशिक्षक आणि उत्तम संघटक अशी ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांची ख्याती होती. निवृत्तीनंतरही त्यांचे क्रिकेटशी नाते तुटले नाही. विशेष म्हणजे बाळा या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं क्रिकेटप्रेम जपलं. या चित्रपटामध्ये त्यांनी एका क्रिकेट प्रशिक्षकाची भूमिका वठविली आहे. हा चित्रपट येत्या ३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अजित वाडेकर यांना युवा खेळाडूंच्या गुणवत्तेची अचूक पारख होती. कोणामध्ये किती क्षमता आहे ? हे त्यांना बरोबर माहित असे. त्यामुळे बाळा या चित्रपटासाठी क्रिकेट प्रशिक्षकाची भूमिका ते योग्य प्रकारे पार पाडू शकतील असा विश्वास चित्रपटाच्या टीमला होता. त्यासाठीच त्यांना या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या आठवणी साठवून ठेवता येणार आहे. त्याप्रमाणेच त्यांच्या आठवणींना उजाळाही देता येणार आहे.

‘बाळा’ चित्रपटातल्या बाळा या मुलाच्या क्रिकेट ध्यासाची ते कशी दखल घेतात आणि त्याच्या गुणांची पारख करत त्याला कशाप्रकारे घडवतात याची प्रेरणादायी कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या भूमिकेबद्दल विचारणा केल्यानंतर ‘मला अभिनय जमणार नाही!’, असं सांगणाऱ्या अजित वाडेकर यांना अभिनेता विक्रम गोखले यांनी ‘तुला अभिनय नाही तर तुझ्या आवडीची प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळायची आहे’, असं सांगितलं होतं. त्यानंतर विक्रमजींच्या विनंतीला मान देत अजित वाडेकर यांनी या चित्रपटाला होकार दिला होता.

‘यश अँड राज एंटरटेंन्मेट’ या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती, निर्माते राकेश सिंग यांनी केली असून सचिंद्र शर्मा यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात उपेंद्र लिमये, क्रांती रेडकर, विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत या मातब्बर कलाकारांसोबत मिहीरीश जोशी हा नवा चेहरा तसेच यशवर्धन–राजवर्धन, आशिष गोखले, ज्योती तायडे अपेक्षा देशमुख, हिया सिंग हे सहकलाकार दिसणार आहेत.

सोनू निगम, आदर्श शिंदे, रोहित राऊत, निहार शेंबेकर, उर्मिला धनगर या गायकांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. विजय गमरे यांनी लिहिलेल्या गीतांना महेश-राकेश यांनी संगीत दिले आहे. छायांकन आर.आर प्रिन्स तर संकलन अभिजीत कुंदार यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन विष्णू देवा, हबीबा रेहमान, फुलवा खामकर यांनी केले आहे. वेशभूषा चैत्राली डोंगरे यांची आहे.३ मे ला ‘बाळा’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 5:24 pm

Web Title: ajit wadekar enacted in upcoming marathi movie bala
Next Stories
1 बॉक्स ऑफिसवर ‘कलंक’ची ५४ कोटींची कमाई!
2 #SriLanka : श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाविषयी बॉलिवूड कलाकार म्हणतात…
3 ‘मेंटल है क्या’ च्या शीर्षक वादात कंगनाच्या बहीणीची उडी
Just Now!
X