‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करून अभिनेता अक्षय कुमार आता त्याच्या नव्या चित्रपटाकडे वळला आहे. दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांचा हा चित्रपट असून यासाठी तो १८ मार्चला अयोध्या इथं जाणार आहे आणि राम जन्मभूमीवरूनच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
अक्षय नुकताच त्याच्या परिवारासोबत सुट्टी घालवण्यासाठी मालदिवला गेला होता. तिकडून परत आल्यानंतर त्याने आपल्या कामाला सुरुवात केली आहे. या नव्या चित्रपटाचं नाव आहे ‘रामसेतू.’ या चित्रपटाचं शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणांवर होणार असून हे पुढचे काही महिने चालणार आहे.
View this post on Instagram
८० टक्के चित्रपट मुंबईत शूट होणार असल्याचं या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सांगितलं. या चित्रपटात अक्षयचा लूक काहीसा वेगळाच असणार आहे असंही ते म्हणाले. अक्षयची भूमिका ही एका पुरातत्व शास्त्रज्ञाची असून त्याचा लूकही त्यानुसार केलेला आहे. चाहते त्याला या अवतारात बघून खूश होतील असं दिग्दर्शकांनी सांगितलं.
या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरुचा या दोघी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. परंतु, त्यांचे लूक्स अद्याप गुलदस्त्यात आहेत. फभारतीय संस्कृती आणि परंपरा, भारताचं प्राचीन काळातलं महत्त्व, भारताचा समृद्ध वारसा यावर भाष्य करणारा हा चित्रपट असणार आहे.
या व्यतिरिक्त अक्षय कुमार ‘सूर्यवंशी’ या चित्रपटातही दिसणार आहे. हा त्याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. तर अभिनेत्री सारा अली खान सोबत तो ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे.