बॉलिवूडमध्ये सध्या आत्मचरित्रपट आणि सामाजिक विषयांवरील आधारित चित्रपटांची चलती आहे. गेल्या काही वर्षांत विनोदी चित्रपटांपेक्षा आशयघन चित्रपटांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न निर्माते, दिग्दर्शक करत आहेत. त्यांना तशीच साथ कलाकार मंडळीही देत आहेत. या कलाकारांमधील एक नाव म्हणजे अक्षय कुमार. ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’नंतर त्याचा आगामी ‘पॅडमॅन’ हा चित्रपटदेखील एका महत्त्वाच्या विषयावर आधारित आहे. अक्षयचा हा चित्रपट ‘शोले’ प्रमाणेच मनोरंजक असेल असे स्वतः चित्रपटाच्या दिग्दर्शकाने म्हटले आहे. दिग्दर्शक आर बाल्की यांना याबाबत विचारले असता त्यांनी हटके उत्तर दिले.

वाचा : ‘अक्षयसारखी सुधारणा सलमान, आमिरमध्येही नाही’

‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्यावर आधारित आहे. मासिक पाळीमध्ये महिलांची शारिरीक स्वच्छता किती आवश्यक असते हे त्यांनी जाणले. त्यांनी विशेषत: खेड्यातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार केले आणि त्यानिमित्ताने अनेक स्त्रियांना रोजगार मिळवून दिला.

आर बाल्की म्हणाले की, ‘अरुणाचलम यांचे आयुष्य तितकेच रंजक आहे जितका शोले होता. इतर बॉलिवूड मसाला चित्रपटांप्रमाणेच पॅडमॅनसुद्धा मनोरंजक असेल. या विषयावर अद्याप चर्चा न झाल्याने हे नक्कीच पाहण्याजोगे असेल.’

वाचा : EXCLUSIVE उर्मिला सांगतेय गरोदरपणातील तिच्या अनुभवाबद्दल..

खुद्द दिग्दर्शकानेच ‘पॅडमॅन’ची तुलना ‘शोले’शी केल्यावर अक्षयचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर असेल यात शंका नाही. ‘पॅडमॅन’ पुढील वर्षी १३ एप्रिलला प्रदर्शित होईल. अक्षयसोबत सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाद्वारे अक्षयची पत्नी, अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.