संपूर्ण देशामध्ये करोनाची दुसरी लाट वेगाने पसरली आहे. या दुस-या लाटेमध्ये अनेकांना करोनाची लागण झाल्याने रुग्णसंख्या कमालीची वाढली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. परिणामी लोकांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीये. इतकेच नाही तर आवश्यक ती औषधेही मिळत नाहीये. या परिस्थितीवर सरकारकडून मदत केली जात आहे परंतु ही मदतही तोकडी पडत आहे. हे पाहून आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हीने मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हीने नुकतंच तिच्या ट्विटर अकाऊंटवरून चार टेम्प्लेट शेअर केलेत. यात सध्याच्या करोना काळात लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची माहिती देण्यात आलीये. एकूण चार संस्थांची नावं, कोणत्या सेवेसाठी कार्यरत आहेत ते क्षेत्र, संपर्क क्रमांक, पत्ता अशी एक यादीच या टेम्पेटमध्ये देण्यात आलीय. हेमकुंट फाउंडेशन, हसिरू डाला फाऊंडेशन, रूरल हेल्थकेअर फाऊंडेशन आणि नोतून जीबन अशी या चार सामाजिक संस्थांची नावं आहेत.

या सर्व संस्था ऑक्सिजन ते रुग्णवाहिकांपासून अन्न या सगळ्या गरजेच्या वस्तू पुरवण्याचे अविश्वसनीय काम करत आहेत. क्वारंटाइन रुग्णांसाठी भोजन आणि करोना व्हायरसशी झुंजणाऱ्या रुग्णांना औषधे उपलब्ध करून देण्याचं काम देखील या संस्था करत आहेत.

ज्या पद्धतीने सध्याच्या कोव्हिट संकटात ऑक्सिजन आणि बेड्सची गरज निर्माण झाली आहे, त्याच पद्धतीने कठीण काळात मदत कुठून मिळेल याची माहिती देखील अनेकांपर्यंत पोहोचलेली नसते. मदत कशी मिळवायची हेच माहिती नसल्याने अनेक रूग्ण मदतीविनाच मृत्यू पावतात. यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार आता पुढे सरसावले आहेत. त्यांच्या सोशल मिडीयाचा वापर ते करोना काळातील उपयुक्त माहिती त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी करताना दिसून येत आहेत.