सध्या अभिनेता आमीर खानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आमीर त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अभिनेत्री करीना कपूर खानबद्दल बोलताना दिसत आहे.

आमीरच्या एका फॅनच्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडिओ आहे. यात तो म्हणतो की, ‘लाल सिंग चड्ढा’ या वर्षीच्या ख्रिसमसला प्रदर्शित होईल. तो म्हणतो, “जर परिस्थिती ठीक असेल, आम्ही ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडत गेल्या. तर या वर्षीच्या अखेरपर्यंत चित्रपट प्रदर्शित होईल.” आमीर आपली पत्नी किरण राव हिच्यासोबत या मुलाखतीत सहभागी झाला होता. जेव्हा आमीरने या वर्षीच्या शेवटापर्यंत चित्रपट प्रदर्शित करण्याविषयी सांगितलं तेव्हा किरण म्हणाली, “ख्रिसमस दरम्यान.”

आमीरने यावेळी सांगितलं की कशा पद्धतीने या महामारीच्या काळात चित्रीकरणाचं नियोजन केलं. तो म्हणाला, “या काळात करोनाचा उद्रेक झाला होता. त्यात करीनाने आपण गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे आमच्यासाठी परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. तिच्या गरोदरपणामुळे आम्हाला अधिक खबरदारी घेऊन चित्रीकरण करणं भाग होतं. त्यामुळे सगळं जग जेव्हा करोनाच्या संकटाला सामोरं जात होतं तेव्हा आम्ही करोना आणि करीना दोघांनाही सामोरे जात होतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमीर आणि करीनाने ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचं चित्रीकरण मार्च २०१९मध्ये सुरु केलं होतं. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाला ज्या वर्षी तो प्रदर्शित झाला त्या वर्षीचा म्हणजे १९९४चा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा अकॅडमी पुरस्कारही मिळाला आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट २०२० सालच्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार होता. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे ह्याचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे.