तब्बल २३ दिवसांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. बिग बींचा करोना रिपोर्ट अखेर निगेटिव्ह आल्याने रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेक बच्चनने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. ११ जुलै रोजी बिग बींचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच दिवशी रात्री त्यांना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. अखेर त्यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

अमिताभ बच्चन यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बच्चन कुटुंबातील सर्वांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात अभिषेक बच्चनचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अभिषेक बच्चनलाही ११ जुलै रोजी नानावटीमध्ये दाखल करण्यात आलं. ‘सुदैवाने माझ्या वडिलांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते आता घरीच आराम करतील. तुम्हा सर्वांनी केलेल्या प्रार्थनांबद्दल तुमचे मनापासून आभार’, असं ट्विट अभिषेकने केलं.

बिग बी अभिषेक बच्चनसह ऐश्वर्या आणि आराध्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना आधी घरातच क्वारंटाइन करण्यात आलं होतं. मात्र एका आठवड्यानंतर त्यांनासुद्धा नानावटीमध्ये दाखल करण्यात आलं. या दोघींना करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर जया बच्चन यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. बिग बी रुग्णालयात असतानाही सोशल मीडियावर सक्रिय होते. फोटो, पोस्ट, व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात होते. अभिषेक बच्चन अजूनही रुग्णालयात आहे.