बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. तो सतत त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. नुकताच अनुरागने मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकरचा ‘स्थलपुराण’ हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत अक्षयचे कौतुक केले आहे.

अनुराग कश्यपने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘स्थलपुराण’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत पोस्ट लिहिली आहे. “मी अक्षय इंडीकरचा ‘स्थलपुराण’ हा चित्रपट पाहिला. खूप सशक्त चित्रपट आहे. ज्या वेळी एका लहान मुलाला त्याचे वडील हे जग सोडून निघून गेले आहेत याची जाणीव होते तेव्हा त्या मुलाच्या मनात येणारे विचार आणि भावना चित्रपटात अतिशय सुंदररीत्या दाखवले आहे.. त्यानंतर आवाज, कोकणातील सुंदर देखावे, शार्प एडिटिंग पाहण्यासारखे आहे’ या आशयचे कॅप्शन देत अनुरागने कौतुक केले आहे.

पुढे तो म्हणाला की ‘ज्या प्रकारे अक्षय आणि त्याची संपूर्ण टीम काम करते ते पाहून मला प्रेरणा मिळाली. स्थलपुराण चित्रपट बर्लीन अंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात ‘जनरेशन कॉम्पिटिशन’ या विभागात प्रदर्शीत झाला होता. तसेच केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाने बाजी मारली आहे.’

‘स्थलपुराण’ या चित्रपटाला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारतात सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘स्थलपुराण’ चित्रपटाला अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे दोन पुरस्कार मिळाले. यामध्ये ‘सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपट’ आणि ‘भारतातील सर्वोत्कृष्ट नवीन दिग्दर्शक’ या दोन पुरस्कारांचा समावेश आहे.

अक्षय इंडीकरला त्याच्या या चित्रपटासाठी यापूर्वीही अनेक मानाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ओळख असलेला ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कारदेखील दिग्दर्शक अक्षय इंडीकरला मिळाला आहे. फिल्म जगतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. ‘स्थलपुराण’ या चित्रपटातील विशेष दिग्दर्शकीय कामगिरी लक्षात घेता त्याला हा पुरस्कार देण्यात आला होता. ऑस्ट्रेलियातील ‘आशिया पॅसेफिक स्क्रीन अकॅडमी’, ‘ग्रिफिथ स्कूल’ आणि ‘युनेस्को’ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.