अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) मंगळवारी अटक केली. तसेच न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून तिला ‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली आहे. दरम्यान एनसीबीने केलेल्या या कारवाईवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली. रियाला पाठिंबा देणाऱ्या या कलाकारांवर सध्या सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका होत आहे. मात्र या टीकाकारांना दिग्दर्शक अनुराग कश्यप याने प्रत्युत्तर दिलं आहे. रियाला पाठिंबा का दिला जातोय? याचं कारण त्याने सांगितलं आहे.

अवश्य पाहा – ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्री संजना गलरानीला अटक

“रियाला शिक्षा व्हावी अशी तुमची इच्छा आहे. पण हे आरोप तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारावर करत आहात. रिया गुन्हेगार आहे, हे तुम्हाला कसं कळलं? रियाला होणाऱ्या मानसिक त्रासाचा तुम्हाला अंदाज लावता येणार नाही. आम्ही सुशांतला गेल्या १० वर्षांपासून ओळखतोय. याच इंडस्ट्रीमध्ये तो काम करत होता. आम्ही सुशांतला तुमच्यापेक्षा जास्त ओळखत होतो त्यामुळे आम्ही शांत राहिलो. पण आता गोष्टी खूपच पुढे निघून गेल्या आहेत. त्यामुळे आम्ही रियाला पाठिंबा देतोय.” अशा आशयाचं ट्विट करुन अनुराग कश्यपने रियाला पाठिंबा देण्याचं कारण सांगितलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “अनधिकृत बांधकाम उभारलं तेव्हा कुठे होता?”; BMCच्या कारवाईवर दिया मिर्झा संतापली

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) अटक केली आहे. अंमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. ‘एनसीबी’चे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली आहे. त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे.