करोनाचं संकट उद्भवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली. पुढील २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाउन करण्यात येणार आहे. मोदींच्या या घोषणेनंतर अभिनेता, दिग्दर्शक अनुराग कश्यपने त्यांना टोला लगावला आहे. नेहमी आठ वाजताच बोलतात आणि तयारी करण्यासाठी फक्त चार तासांचा अवधी देतात, असा टोमणा त्याने ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.

‘रात्री आठऐवजी सकाळी आठ वाजता बोलले असते तरी बरं झालं असतं. संध्याकाळी चार वाजता घोषणा केली असती तरी व्यवस्था करून ठेवली असती. नेहमी आठ वाजताच बोलतात आणि तयारीसाठी चार तासांचा अवधी देतात. बस किंवा ट्रेन नाही म्हणून जे चालत घरी जातात त्यांचं काय? आता काय बोलावं? ठीक आहे प्रभू!,’ असं अनुरागने ट्विटमध्ये म्हटलं.

आणखी वाचा : ‘इतका मोठा निर्णय घेण्यासाठी हिंमत लागते’; २१ दिवस लॉकडाउनला सेलिब्रिटींचा पाठिंबा

दुसरीकडे मोदींच्या या निर्णयाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी पाठिंबा दर्शविला आहे. इतका मोठा निर्णय घेण्यासाठी खरंच हिंमत लागते, असं म्हणत कलाकारांनी मोदींना साथ दिली आहे. अनुपम खेर, सुमीत राघवन, तापसी पन्नू, रेणुका शहाणे, रंगोली चंडेल यांनीसुद्धा ट्विटरच्या माध्यमातून २१ दिवस लॉकडाउनला पाठिंबा दिला आहे.