News Flash

चित्रचाहूल : अद्भुत सफर

अलीकडे आलेलं वासंती फडके यांनी अनुवाद केलेलं ‘सेपियन्स’ नावाचं पुस्तकही वाचलं जातंय.

(संग्रहित छायाचित्र)

भक्ती परब

मानवी उत्क्रांतीविषयी आपल्याला अजूनही कुतूहल आहे. उत्क्रांती कशी घडून आली? याविषयी आजही जाणून घ्यायची ओढ असते. उत्क्रांतीमागचं वैज्ञानिक सत्य, कुठल्याही परिस्थितीत टिकून राहण्याची धडपड, अस्तित्वाची लढाई अशा अनेक गोष्टी याबाबतीत आपल्या आकर्षित करतात. अलीकडे आलेलं वासंती फडके यांनी अनुवाद केलेलं ‘सेपियन्स’ नावाचं पुस्तकही वाचलं जातंय. हे संदर्भ अशासाठी, की ‘फर्स्ट मॅन’ नावाच्या लघुपटाचा डिस्कव्हरी वाहिनीवर १५ जानेवारीला प्रीमियर करण्यात आला. तोच लघुपट पुन्हा एकदा ४ फेब्रुवारीला रात्री ९ वाजता दाखवला जाणार आहे. त्यामुळे ज्यांची पहिली संधी हुकली होती, त्यांच्यासाठी ही सुवार्ता.

* छोटय़ा पडद्यावर अद्भुत सफर अनुभवायची असेल तर ‘गोल्ड रश’, ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’, ‘नेक्ड अँड अफ्रेड’, ‘इंडियाज सिटिझन स्कॉड’, ‘डेड बाय डॉन’ हे कार्यक्रम पाहण्यासारखे आहेत. आपल्या नेहमीच्या मालिकांच्या वेळापत्रकात बसणारे नाहीत, त्यासाठी खास वेळ काढावा लागेल.

*  डिस्कव्हरी वाहिनीवर नेहमीच काही तरी वेगळं पाहायला मिळतं. ‘गोल्ड रश’, ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’, ‘नेक्ड अँड अफ्रेड’ हे गाजलेले कार्यक्रम अधूनमधून पुनप्र्रसारित केले जातात. ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’चे काही गाजलेले भाग अजूनही प्रेक्षक आवडीने बघतात. ‘गोल्ड रश’ ही सीरिजही त्यापैकीच एक. आतापर्यंत या सीरिजचे ८ पर्व झाले आहेत. त्याचबरोबर ‘गोल्ड रश-द जंगल’, ‘गोल्ड रश-साऊथ आफ्रिका’, ‘गोल्ड रश-व्हाइट वॉटर’ असे वेगळे भागही आहेत. सध्या ‘गोल्ड रश-व्हाइट वॉटर’ सीरिजने प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. ‘गोल्ड रश’चे नववे पर्व १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या पर्वात प्रेक्षकांनाही सोनं मिळवण्याची संधी मिळणार आहे.

* पाण्याचा वेगात येणारा प्रवाह आणि प्रवाहातून तरून जाण्यासाठी ‘टीम ब्लू’ची धडपड, दुसरीकडे ‘टिम रेड’चे एकोप्याचे कौशल्य, त्याचबरोबर कु ठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही, असा जोश घेऊन उतरलेल्या या दोन्ही टीमचं धाडस बघायचं असेल तर ‘इंडियाज सिटिझन स्कॉड’ ही सीरिज पाहण्यासारखी आहे. सैनिकी पार्श्वभूमी असलेल्या या सीरिजमध्ये सैन्यामधील काही प्रसिद्ध अधिकारी धाडसी नागरिकांची निवड करतात आणि त्यांना वेगवेगळी आव्हानं देण्यात येतात. सध्या या सीरिजमधील काही जुने गाजलेले भाग पुनप्र्रसारित करण्यात येत आहेत. हीसुद्धा डिस्कव्हरी वाहिनीवरील गाजलेली सीरिज आहे.

*  नॅट जिओ वाइल्ड या वाहिनीवर प्राण्यांचं जग आणि निसर्गाचं अद्भुत, रहस्यमय रूप वेगवेगळ्या कार्यक्रमांत पाहायला मिळतं. त्यापैकीच एक सध्या गाजत असलेली सीरिज म्हणजे ‘डेड बाय डॉन’. ‘हॉरर नेचर शो’ अशी संकल्पना घेऊन करण्यात आलेले या सीरिजचे प्रोमो लक्षवेधी ठरले. त्याचबरोबर सीरिजचा प्रत्येक भागही तितकाच प्रभावी ठरला. निसर्गामध्ये एक वेगळं विश्व सामावलंय. त्यात नाटय़ही आहे, याला अधोरेखित करणारी ही सीरिज. एखादा रहस्यपट पाहतोय, असा अनुभव देणारी ही सीरिज सहा भागांमध्ये भारताबाहेरील प्रेक्षकांना ती २०१८ मध्ये अनुभवता आली. आता या वर्षी ही सीरिज भारतात पुनप्र्रसारित करण्यात येतेय.

*  मराठी मनोरंजन विश्वात डोकावायचं तर.. खोलीचं दार उघडलं, मात्र आठवणींचं दार बंद झालं.. अशा आशयाचा प्रोमो झी मराठीवर झळकतोय. त्याआधीचा शेवंता परत आल्याचा प्रोमोही लक्षवेधी होता. ‘रात्रीस खेळ चाले’चं दुसरं पर्व त्यातल्या बच्चेकंपनीमुळे गाजतंय. लहानगी छाया समाजमाध्यमांवर भलतीच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतून अपूर्वा नेमळेकर-देशपांडे ही अभिनेत्री छोटय़ा पडद्यावर परतली आहे. ‘आभास हा’ मालिकेतील मुख्य भूमिकेतून ती झळकली होती. त्यानंतर तिने काही छोटय़ा भूमिका केल्या; पण त्यानंतर ती छोटय़ा पडद्यापासून दूर होती.

* ‘कौन बनेगा करोडपती’चे प्रोमो दूरचित्रवाणीवर पाहिले की मन शाळकरी होऊन जाते. शाळेतल्या प्रश्नमंजूषा स्पर्धा आठवतात. अरे, एवढा साध्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं आलं नाही, म्हणून चुकचुकतो.. तेच सगळं वातावरण छोटय़ा पडद्यावर ‘कौन बनेगा करोडपती’च्या निमित्ताने अनुभवायला मिळतं. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या धीरगंभीर आवाजातील सूत्रसंचालन, मेंदूला चालना देणारे प्रश्न यामुळे हिंदीतील ‘केबीसी’ जाहिरातींचा मारा असूनही पाहावेसे वाटते. मराठीत हा कार्यक्रम पहिल्यांदा कलर्स मराठी वाहिनीवर अभिनेते सचिन खेडेकर यांच्या सूत्रसंचालनाने २०१३ मध्ये सादर झाला होता. आता सोनी मराठी वाहिनीवर ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम येतोय.

* झी मराठी वाहिनीवरील ‘कानाला खडा’, ‘रात्रीस खेळ चाले दुसरे पर्व’ आणि ‘झिंग झिंग झिंगाट’ हे कार्यक्रम चांगलेच रंगताना दिसतायत.

* ‘कानाला खडा’ हा कार्यक्रम त्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पाहुण्या कलाकारांमुळे आठवणींच्या रम्य सफरींवर घेऊन जातो, तर आदेश बांदेकर यांच्या सूत्रसंचालनाने रंगणारा ‘झिंग झिंग झिंगाट’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही प्रेक्षकांना ‘ताक धिना धिन’ कार्यक्रमाची आठवण होतेय. तसेच गाण्यांचीही उजळणी होतेय. प्लेलिस्ट करता करता भेंडय़ा खेळणं हे तसं हल्ली विसरलोच आपण. या कार्यक्रमामुळे ते जुने दिवस परततील, असं वाटतंय.

* स्टार प्रवाह वाहिनीवर ‘छत्रीवाली’ मालिकेत पार पडलेला विक्रम आणि मधुराचा साखरपुडा, पुंडलिकाने का उभारलं विठ्ठलाचं मंदिर याचा ‘विठू माऊली’ मालिकेतील उलगडा त्यानंतर ‘नकळत सारे घडले’ मालिकेत अभिनेता आस्ताद काळेचा प्रवेश यामुळे वाहिनीवर पुढील आठवडय़ात मनोरंजक हलचल पाहायला मिळणार, असं दिसतंय.

* तरीही वेळ काढून वेगळ्या मनोरंजन विश्वाची सफर करायची असल्यास ‘पपी बाऊल’ हा गेम शो अ‍ॅनिमल प्लॅनेट्स वाहिनीवर पाहू शकता. जंगल सफारीवर जायचं असेल तेही भारताला समृद्ध अशा जंगलांचा वारसा लाभलेल्या, तर ‘इन टू द वाइल्ड’ हा नवा शो सुरू झालाय. नयनरम्य गर्द घनदाट अशी जंगले आणि त्यामध्ये सामावलेले, आपल्याला परिचित-अपरिचित असे स्तिमित करणारे वन्यजीवन या शोमध्ये पाहायला मिळेल. भारतीय जंगलांची ही मनमोहक सफर अ‍ॅनिमल प्लॅनेट्सवर दर सोमवारी पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 12:45 am

Web Title: article about new documentaries
Next Stories
1 चित्ररंग : हसत खेळत ‘धडा’
2 दोन मित्र
3 वेबवाला : संयत आणि प्रभावी
Just Now!
X