मानसी जोशी

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे खाजगी जीवन हा चाहत्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिला आहे. कलाकार मंडळी मॉल-हॉटेल किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसल्यास प्रसारमाध्यमांत त्याची चर्चा चवीने रंगते. हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात ‘पापाराझी’ छायाचित्रकारांचा मोलाचा वाटा असतो. समाजमाध्यमाचा वापर, नवीन तंत्रज्ञान, छायाचित्रकारांची वाढलेली संख्या, ‘पीआर’चा शिरकाव या कारणांमुळे बॉलीवूडमधील ‘पापाराझी’ संस्कृती लोप पावत चालली आहे. वांद्रे, जुहू, अंधेरी या भागात ऊन, पाऊस, वाऱ्याची तमा न बाळगता काढलेली कलाकारांची छायाचित्रे आणि त्या तुलनेत मिळणारे तुटपुंजे मानधन या आव्हानांना सामना करत ‘पापाराझी’ छायाचित्रकार छायाचित्रे काढत आहेत. कलाकारांच्या असण्यासोबतच दिसणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या या ‘पापाराझी’ संस्कृतीचा मांडलेला लेखाजोखा..

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप
Review of Rohini Nilekanis book Shambharital Shahanapan on durgabai Nilekani
शंभरीतलं शहाणपण!

कलाकारांच्या नकळत त्यांची छायाचित्रे काढणाऱ्या छायाचित्रकारांना पापाराझी छायाचित्रकार असे म्हणतात. ‘पापाराझी’ या शब्दाचा उगम कसा झाला याचीही रंजक कथा आहे. १९६० मध्ये ‘ला डॉलसे विटा’ या इटालियन चित्रपटात वॉल्टर सँन्टेसो या अभिनेत्याने पापाराझो या छायाचित्रकाराची भूमिका साकारली होती. यावरून ‘पापाराझी’ हा शब्द रूढ झाला. अमेरिकेमध्ये पापाराझी संस्कृती नुकतीच उदयाला आली होती. पंतप्रधानांची पत्नी जॅकलिन केनेडी रॉन यांनी ७२ साली गॅलेला नावाच्या छायाचित्रकाराचा कॅमेरा काढून घेतला होता. पापाराझींना चुकवताना राणी डायनाचा झालेला मृत्यू तिच्या चाहत्यांना चटका लावून गेला. बॉलीवूडमध्ये पापाराझी संस्कृ ती अंमळ उशिराच उदयाला आली. बॉलीवूडमध्ये चालणाऱ्या चित्रपटाच्या पार्टी आणि प्रीमियरमध्ये विविध छायाचित्रे आणि गॉसिप मिळत असे. यात कलाकारांची प्रेमप्रकरणे, चित्रपटाचे लूक याची माहिती या निमित्ताने मिळत असल्याने छायाचित्रकार पार्टीना जातीने हजर राहत होते.

असे चालते पापाराझींचे काम..

सध्या बॉलीवूडमध्ये मानव मांगलानी, विरल भायानी, योगेन  शाह, आणि जितेंद्र चावला हे प्रमुख पापाराझी छायाचित्रकार असून यांच्याकडे आजमितीस १० ते १५ छायाचित्रकार काम करतात. या क्षेत्रात काम करणाऱ्या छायाचित्रकाराकडे स्वत:ची दुचाकी, कॅमेरा, लॅपटॉप आणि चांगल्या प्रतीचा मोबाईल असणे जरुरीचे असते. मुंबईतील जुहू, बांद्रा, वर्सोवा, अंधेरी ही कलाकार हमखास दिसण्याची ठिकाणे आहेत. तेथे सकाळ ते संध्याकाळ ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता ते उभे असतात. कलाकार अथवा त्यांची गाडी दिसल्यास पाठलाग करून छायाचित्रे काढली जातात. अनेक महिन्यांच्या सवयीनंतर कलाकारांच्या सलोन, पार्लर, जिममधील येण्या-जाण्याच्या वेळा  तसेच कलाकारांच्या गाडीचे नंबरही पाठ होतात. चारचाकीच्या ब्रँड आणि क्रमांकावरून ती कोणत्या कलाकाराची आहे याची ओळख पटते. ही छायाचित्रे काढल्यावर वायफायच्या मदतीने मोबाइलमध्ये टाकून आपल्या कंपनीस, वृत्तपत्रास आणि समाजमाध्यमावर पाठवली जातात. एका छायाचित्रास २०० ते ३०० रुपये मिळतात. कलाकारांचे चांगले आणि वेगळे छायाचित्र असल्यास त्याचे दर अधिक असतात. बॉलीवूडमध्ये खान मंडळी, प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, रणबीर सिंग, कपूर घराणे, विकी कौशल, राजकुमार राव, अनुराग कश्यप, नताशा पूनावाला, करण जोहर, आलिया भट, शाहीद कपूर, मलायका अरोरा खान, फरहान अख्तर यांच्या छायाचित्रांना जास्त मागणी असल्याचे या क्षेत्रातील छायाचित्रकारांनी सांगितले.

‘मिड डे’ मध्ये छायाचित्र संपादक असलेले आशीष राणे यांनी दहा वर्षांपूर्वीच्या मनोरंजनविश्वातील आठवणी सांगितल्या. मालाडला इनऑर्बिट किंवा इन्फिनिटी मॉल येथे रविना डंटन दिसल्यास छायाचित्रे काढायचो. त्यासाठी तासन्तास एकाच जागी कॅमेरा घेऊन उभे राहावे लागत असे. या क्षेत्रात अनेक वर्षांच्या अनुभवानंतर कलाकारांच्या गाडीचे क्रमांकही पाठ होऊ लागले. कलाकार गाडीतून उतरल्यानंतर फोटो काढण्यास विरोध करेल किंवा आपली मेहनत फुकट जाणार याची भीती होती. तेव्हा आमचे ज्येष्ठ सहकारी सांगायचे की विमानतळावर जा. तेव्हा विमानतळावर उभे राहिल्यास हमखास फोटो मिळण्याची शाश्वती असायची. प्रत्येक वृत्तपत्रात कलाकारांच्या छायाचित्रांची गरज असते. त्यामुळे एकाच वेळेस सात ते आठ वेगवेगळ्या कलाकारांची छायाचित्रे काढावी लागतात. पापाराझीचा अर्थ आता लोप पावत चालला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

विद्या बालन, इलियाना डिक्रुझ भाजी आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी जातात तेव्हा ती छायाचित्रे लोकप्रिय होतात. कलाकाराला रुपेरी पडद्यावर चांगले कपडे, मेकअपमध्ये पाहण्याची सवय प्रेक्षकांना असते. कलाकार मेकअपशिवाय बाहेर जातात याविषयी लोकांना उत्सुकता असते. सलोन, जिम, पार्लर, हॉटेल, कॅफे आणि रेस्टॉरंट्स येथे कलाकार वारंवार दिसून  येतात. आता पीआरमुळे (जनसंपर्क अधिकारी) पापाराझी छायाचित्रकारांचे काम सोपे झाले आहे. एखादा स्टार कलाकार हॉटेलमध्ये येणार असल्यास त्यांच्या पीआरकडून छायाचित्रकाराला संदेश दिला जातो. काही वर्षांपूर्वी कलाकाराचे ठिकाण आणि वेळा याबद्दल अंदाज बांधले जायचे. परंतु आता समोरून सांगितले जात असल्याने कलाकारांचे दिसणे अधिकच सुलभ झाले आहे.

२०१३-१४ पासून देशात पापाराझी संस्कृ ती वाढली आहे याबद्दल मानव मांगलानी सांगतात की, नऊ ते दहा वर्षांपूर्वी अनेक गोष्टी पापाराझींमुळे प्रेक्षकांना माहिती झाल्या. कलाकारांची प्रेमप्रकरणे, ऐश्वर्या बच्चनची मुलगी आराध्या हिची पहिली झलक, ऐश्वर्या – अभिषेकचे लग्न, राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्राची मुलगी अदिरा यांचे पहिले छायाचित्र हे पापाराझींमुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. फ्लॉप झालेल्या यशराजच्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’मधील अमिताभ बच्चन आणि ‘संजू’तील रणवीर कपूरच्या पहिल्या लूकची छायाचित्रे आपण काढल्याचे ते अभिमानाने सांगतात. ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाचे छायाचित्र काढतानाचा किस्सा मांगलानी यांनी सांगितला. अभिषेक बच्चन घोडय़ावर बसलेला असताना मुंडावळ्यांमागून दिसणारा त्याचा चेहरा टिपण्याचा प्रयत्न मी केला होता. ‘रॉयटर्स’ या नामांकित संस्थेने छायाचित्रे खरेदी केली. अनेक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर माझे छायाचित्र छापले गेले होते. दहा वर्षांपूर्वी वेगळ्या छायाचित्रास ५० ते ७५ हजार रुपये मिळत होते. आता एका छायाचित्रास २०० ते ३०० रुपयेही मुश्किलीने मिळतात. तारा सुतारिया – अधर जैन, टायगर – दिशा, वरुण – नताशा यांची छायाचित्रे आम्ही घेतली आहेत, असेही मानव मांगलानी यांनी सांगितले. या क्षेत्रात छायाचित्रकारांची संख्या वाढल्याने स्पर्धा निर्माण झाली आहे. कलाकारांची छायाचित्रे समाजमाध्यमावर एकाच पोझमध्ये असल्याने त्यात नावीन्य राहिले नसल्याची खंतही ते व्यक्त करतात.

आज पापाराझी संस्कृती लोप पावत असल्याची नाराजी छायाचित्रकार योगेन शहा यांच्या शब्दातून स्पष्ट जाणवते. कलाकारांच्या नकळत छायाचित्रे काढणे हा पापाराझीचा मूळ उद्देश असतो. आता कलाकार पापाराझींना इतके सरावलेले आहेत की स्वत: छायाचित्रकारांना फोटो देतात. पाच-दहा वर्षांपूर्वी प्रेक्षकांना कलाकारांच्या प्रेमप्रकरणांबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे या प्रेमप्रकरणाबद्दल पहिले फोटो कोण आणतो यासाठी चुरशीची स्पर्धा असायची. कारण कलाकार चारचौघांत बाहेर जाणे टाळायचे. आता कलाकारही खुलेपणाने आपल्या प्रेमप्रकरणाची जाहीर कबुली देतात. आधी चित्रपटांच्या पार्टी आणि प्रीमियर आयोजित व्हायचे. प्रसारमाध्यमांची संख्या कमी असल्याने कलाकारांचे दिसणेही दुर्मीळ होते. आता कलाकारांचे दिसणे ही सामान्य बाब झाली आहे. यात छायाचित्रकार अभिनेत्रींचे फोटो काढताना विशेष काळजी घेतात. मी सहकाऱ्यांना अभिनेत्री गाडीतून उतरत असताना आणि कपडे नीट करताना छायाचित्रे काढण्यास सक्त मनाई केली असल्याचे योगेन शहा यांनी सांगितले.

कलाकारांची नेहमीची दिसण्याची ठिकाणे

पृथ्वी थिएटर, सोहो तसेच ऑलिव्ह बार, सेंट रेगिस, निर्माते- दिग्दर्शक यांचे कार्यालय, पीव्हीआर अंधेरी, जुहू आणि वर्सोवा हे परिसर, कलाकारांचे जिम याचबरोबर ‘मडॉक’, ‘यशराज’, ‘धर्मा’, ‘आरएसव्हीपी’ या निर्मिती संस्थांच्या कार्यालयात कलाकारांचा वावर जास्त दिसून येतो.

या क्षेत्रातील आव्हाने

समाजमाध्यमाचा वाढता वापर आणि तंत्रज्ञानामुळे पापाराझी छायाचित्रकारांचे काम सोपे झाले असले, तरीही त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. छायाचित्रकार कित्येक तास उभे राहतात तेव्हा त्यांच्या हाती एक चांगले चित्र लागते. त्या बदल्यात त्यांना मानधन कमी मिळते. हे लोक पडद्याआडून काम करत असल्याने त्यांच्या कामाची दखल बाहेर फारशी घेतली जात नाही. तसेच पायरसीचे प्रमाण वाढते आहे. अर्थात या आव्हानांचा सामना करावा लागत असला तरीही अनेक मुलीही आता या क्षेत्राकडे वळू लागल्या आहेत.

एअरपोर्ट लुक

कलाकारांचे हमखास दिसण्याचे ठिकाण म्हणजे ‘मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’. येथे कलाकाराने घातलेले कपडे, दागिने, चष्मे, चपला, बॅग हे आता फॅशन स्टेटमेंट बनलेले आहे. विमानतळावर घातलेले कपडे, दागिने, केशरचना यांचे अनुकरण तरुण पिढी करते आहे. या संकल्पनेला ‘एअरपोर्ट लुक’ असे गोंडस नामकरण करण्यात आले आहे. प्रियांका चोप्राने या एअरपोर्ट लुकची सुरुवात केली असल्याचे विरल भायानी यांनी सांगितले. पापाराझी छायाचित्रकार येथे चोवीस तास तळ ठोकून असतात. इंग्रजी वृत्तपत्रे, संकेतस्थळ आणि मनोरंजन मासिके यांनी एअरपोर्ट लूकला मोठे केले आहे. कलाकारही विमानातून उतरताना दिसण्याकडे विषेश लक्ष देत आहेत. आधी कलाकार मेकअप करत नव्हते, परंतु एअरपोर्ट लुकला विशेष महत्त्व प्राप्त झाल्यावर मेकअप करून चांगले क पडे घालून येत आहेत. प्रियांकाची गुचीची पर्स, अमिताभचे शूज, रणबीर सिंगच्या नानविध कपडय़ांची समाजमाध्यमावर चर्चा रंगते, असे ते म्हणतात.

स्टार किड्स

अभिनेत्याच्या मुलांना पाहण्यात प्रेक्षकांना विशेष रस असतो. तैमूर अली खान, सुहाना, अबराम, सनी लियोनची मुले, अब्राहम अली खान, आराध्या बच्चन, इनाया खेमू ही  कलाकारांची मुलं प्रेक्षकांच्या खास आवडीची आहेत. सैफ आणि करिनाचे छोटे नवाब तैमूर अली खान हे पापाराझी छायाचित्रकारांचे विशेष लाडके आहेत. तैमूरच्या किंडर गार्डनला जाण्याच्या वेळा, बाहेर खेळण्याची ठिकाणे छायाचित्रकारांना जास्त सवयीची झाली आहेत. तैमूरला छायाचित्रकारांची इतकी सवय झाली आहे की आवाज दिल्यावर तो हात हलवून प्रतिसाद देत असल्याचेही छायाचित्रकार सांगतात. यात अक्षय कुमारची मुलगी निताराचा विशेष उल्लेख करावा लागेल. काही वर्षांपर्यंत विमानतळ किंवा बाहेर घेऊन जायचे असल्यास ट्विंकल आणि अक्षय तिचा चेहरा प्रसारमाध्यमांपासून लपवत होते. शाहरुख खान, करिना कपूर यांनी छायाचित्रकारांना मुलांचे फोटो घेण्यास मनाई केली होती.