News Flash

चित्र चाहुल : पुढचं पाऊल..

काही मालिकांनी ‘पुढचं पाऊल’ टाकत प्रेक्षकांसाठी चमचमीत भागांची मेजवानी सजवली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

निलेश अडसुळ

एकाच ठिकाणी कथा रेंगाळण्यापेक्षा विविध प्रसंगांचे, आशय-विषयांचे हेलकावे घेत कथा पुढे गेली की पाहणाऱ्यालाही मजा येते. हे सूत्र प्रत्येक मालिकेत पाळलं जातंच असं नाही. पण काही मालिका छान वेग घेऊन पुढे जातात आणि त्याच वेगात त्या प्रेक्षकांच्या मनात प्रवेशही करतात. असंच काही मालिकांनी ‘पुढचं पाऊल’ टाकत प्रेक्षकांसाठी चमचमीत भागांची मेजवानी सजवली आहे.

* नव्या वर्षांत ‘सोनी मराठी’ वाहिनीवर सुरू झालेली सावित्रीबाई आणि जोतीबा फुले यांच्या सहजीवनावर आधारित ‘सावित्रीजोती’ ही मालिका सध्या चांगलीच रंगते आहे. विशेष म्हणजे या मालिकेत सावित्रीबाई आणि जोतिबांचे कार्यच नाही तर बालपणही अधोरेखित केल्याने प्रेक्षकही नवं काही जाणून घ्यायला उत्सुक आहेत. हजरजबाबी सावित्री आणि शिक्षणाची ओढ असलेला जोतिबा यांचा आता विवाह ठरला आहे. येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला हा विवाह सोहळा संपन्न होताना दिसेल. पण या लग्नात प्रेक्षकांना इतर लग्नांप्रमाणे केवळ मान-अपमानाचा खेळ नाही तर विचारांचा संघर्षही पाहायला मिळेल. ‘आत्तापर्यंत कुरघोडय़ा करणारे केशवभट्ट या लग्नातही अडथळा आणतील का, जोतीबांचे नातेवाईक स्वत:च्या स्वार्थासाठी लग्न मोडण्याचा प्रयत्न करतील का, की हुंडा प्रथेला जोतिबांचे वडील कडकडून विरोध करतील,’ या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी भागात मिळतील. पण कितीही अडचणी आल्या तरी सावित्रीबाई नवोनत्तीचे माप ओलांडत फुले वाडय़ात प्रवेश करणार हे नक्की.

* ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेत आता आनंदीच्या वाढदिवसाची धामधूम सुरू होताना दिसली तरी या आनंदावर विरजण पडणार आहे. वाढदिवसामुळे उत्साही असलेली आनंदी कुटुंबासोबत खरेदीला बाहेर पडते. पण त्याच दरम्यान मधुरा आणि आनंदीचा अपघात होतो. आगामी भागात प्रेक्षकांना मधुरा आणि आनंदीसाठी प्रार्थना करावी लागणार आहे. गाडीने उडवल्यामुळे आनंदी आणि मधुरा दोघीही गंभीर अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यातलं कुणी तरी दगावण्याची भीती भागवत कुटुंबीयांना वाटत असल्याने मधुरा आणि आनंदी दोघीही सुखरूप या प्रसंगातून बाहेर पडाव्यात, यासाठी प्रेक्षकांना प्रार्थना करावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर येत्या आठवडय़ात ‘सोनी मराठी’ने धमाकेदार सोमवार अशी संकल्पना आखल्याने प्रत्येक मालिकेत काही तरी धमाकेदार घडणार आहे.

* ‘झी मराठी’वरील ‘अगं बाई सासूबाई’ या मालिकेत अखेर आसावरी आणि अभिजीत यांचा शुभविवाह झालेला आहे. या शुभविवाहातही शुभ्राने आसावरीची पुरती पाठराखण करत प्रत्येकाला चोख उत्तरं दिली. पण आजवर प्रेक्षकांसमोर कठोर स्वभावात आलेले दत्ताजी लग्नप्रसंगी मात्र असावरीच्या भक्कम पाठीशी उभे राहिलेले दिसतात. एवढेच नव्हे तर आसावरीची बाजू घेऊन सोहमचे कान धरतात. आता आसावरी नव्या सासरी गेली खरी, पण तिच्या अनुपस्थितीत दत्ताजींना आणि सोहमला तिच्या कष्टाची जाणीव होईल का, तिची उणीव भासेल का, हे आगामी भागात कळेलच. पण त्याचसोबत प्रेक्षकांना आगामी भागात राजस्थानातील उदयपूर पाहायला मिळणार आहे, कारण लग्नानंतर अभिजीत आणि आसावरी उदयपूर दौऱ्यावर जाणार आहेत. फक्त अभिजीत आणि आसावरीच नाही तर सोहम आणि शुभ्राही त्यांच्यासोबत दिसतील. पण स्वार्थाने पछाडलेला सोहम तिथेही अभिजीत आणि आसावरीच्या मध्ये येऊन नवी खलबतं करेल का? केली तर ती काय असतील? त्याच्या कुरघोडय़ांनी उदयपूर दौरा फिस्कटेल का?  हे मात्र लवकरच कळेल.

* स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय  भावनिक वळणावर येऊ न पोहोचली आहे. आगामी भागात आई म्हणून अरुंधतीचा कसोटीचा काळ असणार आहे, कारण अरुंधतीचा मुलगा अभिषेक आणि अंकिता यांचे लग्न अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र कमी शिकलेल्या सासूच्या घरात मी मुलगी देणार नाही, अशी अंकिताची आई रेवती अट घालते. शिवाय लग्नानंतर अभिषेकला घरातून बाहेर पडावं लागेल, असाही तिचा हट्ट आहे. त्यामुळे आता हे लग्न होणार का, की कुटुंबातले सगळे अरुंधतीला दोष देणार हे कळेलच. पण या परिस्थितीत केवळ मुलाच्या आनंदासाठी अरुंधतीला आपल्या भावनांना आवर घालावा लागेल हे मात्र नक्की. परंतु लग्नानंतर अभिषेक वेगळा राहणार या कल्पनेने तिच्या मनाची होणारी घालमेल पुढच्या आठवडय़ात पहायला मिळेल.

* ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सध्या ‘राजा राणीची गं जोडी’ याच  मालिकेची हवा आहे. रणजीत आणि स्वरांगीच्या मोडलेल्या लग्नाने दोन्ही कुटुंबं धास्तावलेली आहेत. लग्न मोडले असले तरी यामुळेच कदाचित संजीवनीचा हात पाहून बेबीमावशीने केलेले भाकीत खरे होताना दिसते आहे. ढाले पाटलांच्या कर्जात अडकलेले बांदल आणि कर्जातून त्यांची सुटका करू पाहणारा रणजीत थेट संजीवनीला लग्नाची मागणी घालतो. संजीवनीला रणजीत आवडत असल्याने ती लग्नाला होकार देणार यात शंकाच नाही, परंतु स्वरांगीमुळे झालेला अपमान विसरून ढाले पाटील संजीवनीचा सून म्हणून मनापासून स्वीकार करतील का, हे मात्र आगामी भागात कळेल. असे असले तरी ढाले पाटलांच्या वाडय़ात संजीवनीचं पडणारं पुढचं पाऊल, दोन मातबर कुटुंबातला हा लग्नसोहळा आणि त्यातला मानपान पाहण्यात प्रेक्षक रंगून जाईल यात शंका नाही.

* ‘हे मन बावरे’ या मालिकेत दुर्गाबाईंच्या एका चुकीमुळे जान्हवी त्यांच्या सर्व संपत्तीवर ताबा मिळवते. आता रस्त्यावर आलेल्या तत्त्ववादी कुटुंबीयांना अनु कशी तारणार, हे आगामी भागात कळेल. पण हे सगळं दुर्गाबाईंमुळे घडल्याने आता त्यांचा कुटुंबामध्ये असलेला वचक तसाच राहील की त्यांचे आणखी काही नवे रूप तत्त्ववादींना पाहायला मिळेल.

* ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत सिद्धीचा पूर्व प्रियकर गौरव आता परत आला आहे. त्यामुळे नुकतेच जुळत आलेले सिद्धी-शिवाचे नाते पुन्हा एकदा कसोटीवर उतरले आहे. आगामी भागात मंगल आणि आत्याबाई सिद्धी-शिवाचे नाते संपवण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसतील. अशा प्रसंगात शिवा आत्याबाईंच्या कटाला बळी पडेल की सिद्धी गौरवकडे पाठ करून शिवासोबत उभी राहील हे पाहण्यासाठी थोडा धीर धरावा लागेल.

मालिकांमधील नायक-नायिका लेखक दिग्दर्शकाच्या कृतीवर अवलंबून असल्याने संहितेचा भाग म्हणून का होईना पण त्यांनी टाकलेलं ‘पुढचं पाऊल’ पाहून प्रेक्षक मनोमन सुखावतात हे मात्र नाकारता येणार नाही. शिवाय आता ‘त्यापुढचे पाऊल काय’ ही आशा कायम असल्याने प्रेक्षक कायम आवडत्या मालिकांशी जोडलेले राहतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 4:40 am

Web Title: article on marathi serial moving at a nice pace abn 97
Next Stories
1 मृण्मयी देशपांडे लेखक-दिग्दर्शकाच्या भूमिकेत
2 लुकलूकते काही.. : पोलिसांची भूमिका देता का..
3 चित्ररंजन : लढाई स्वत:ची, स्वत:साठी
Just Now!
X