मानसी जोशी

२०१८ च्या केपीएमजीच्या अहवालानुसार ९७ टक्के लहान मुले टीव्हीवर कार्यक्रम, मालिका आणि कार्टून्स पाहण्यास पसंती देतात. परंतु वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात मुले भविष्यात ऑनलाइन कार्यक्रम पाहण्याची शक्यता नाकारता येत नाही. बार्कने केलेल्या सर्वेक्षणानुसार लहान मुलांच्या कार्यक्रमाची बाजारपेठ मोठय़ा प्रमाणावर विस्तारली आहे. लहान मुलांचे कार्यक्रम पाहणाऱ्यांची संख्या ही २०१५ मध्ये ४२ दशलक्ष होती.  २०१८ मध्ये हाच आकडा ७७८ दशलक्षावर पोहोचला आहे. लहान मुले सध्या आपला ५० टक्के वेळ हा टीव्ही पाहण्यात किंवा मोबाइलवर गेम खेळण्यात घालवतात. त्याशिवाय, त्यांच्यासाठीच रचलेला आणि त्यांना सहज उपलब्ध होईल असा आशय सध्या फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे हे लक्षात घेऊन ओटीटी प्लॅटफॉर्म्सनीही या क्षेत्रात उडी घेतली आहे.

‘नेटफ्लिक्स’, ‘अ‍ॅमेझॉन’, ‘हॉटस्टार’, ‘वूट’ आणि ‘यूटय़ूब’ या आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी मुलांसाठी उत्तम कार्यक्रम, प्रबोधन आणि मनोरंजन दोन्ही उद्देश साधणारे तसेच त्यांच्या बुद्धीला खुराक मिळेल, असे कार्यक्रम उपलब्ध करून दिले आहेत. आजवर लहान मुलांसाठीच्या मनोरंजन विश्वाला ओटीटी वाहिन्यांवर फारसे महत्त्व दिले जात नव्हते. आता मात्र या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर खास बच्चेकंपनीसाठीच्या आशयावरून चुरशीची स्पर्धा रंगलेली पाहायला मिळते आहे.

सध्या ‘यूटय़ूब किड्स’ या अ‍ॅपवर किशोरवयीन मुलांसाठी सर्वात जास्त कार्टून आणि इन्फोटेन्मेंट आढळून येते. पालकांसाठी पॅरेंटल लॉक, विविध प्रश्नमंजूषा आणि आकर्षक ग्राफिकल युझर इंटरफेस या वैशिष्टय़ांमुळे हे अ‍ॅप आकर्षक ठरले आहे. ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर मात्र लहान मुलांसाठी किड्स आणि फॅमिली या विभागात ‘मिस्टर बीन’, ‘तेनालीराम’, ‘पोपाय द सेलर मॅन’, ‘पॉवरपफ गर्ल्स’, ‘जॉनी टेस्ट’ हे कार्टून्स उपलब्ध आहेत. ‘नेटफ्लिक्सवर’ सध्या लहान मुलांसाठी ‘बॉस बेबी’, ‘बोल्ट’,‘ पेपा पिग’, ‘मादागास्कर’, ‘शार्क टेल’, ‘अँग्री बर्ड्स’, ‘बार्बी’ यांसारखे चित्रपट उपलब्ध आहेत. सध्या ‘झी५’  या अ‍ॅपवर ‘वेल डन किड्स’ हे कार्टून पाहण्यास मिळते. ‘जिओ’च्या अ‍ॅपवर मुलांना डिस्नेच्या ‘लायन किंग’, ‘फाइंडिंग डोरी’, ‘स्पायडरमॅन’, ‘मिकी माऊस’, ‘डोनाल्ड डक’, ‘हल्क’ यापुरतेच मर्यादित असल्याने तेथे भारतीय कार्टून्स अत्यंत कमी पाहण्यास मिळतात. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘हॉटस्टार’ या अ‍ॅपवर तरुणांसाठी माव्‍‌र्हलपट, अ‍ॅव्हेंजर्स, ब्लॅक पँथर, थॉर, आयर्नमॅन यासारख्या सुपरहिरो चित्रपटमालिका उपलब्ध आहेत. मात्र तुलनेने लहान मुलांसाठी फारसा आशय उपलब्ध नाही. त्यामुळे हिंदीत असलेले कार्टून्स अथवा कार्यक्रम आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नसल्याने त्यात वाढ करण्याची मागणी प्रेक्षकांकडून सातत्याने होत आहे. ही मागणी आणि एकूणच लहान मुलांच्या आशयाला मिळणारी लोकप्रियता पाहून ‘वूट’बरोबरच इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर लहान मुलांचे कार्यक्रम वाढण्याची शक्यता असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, जियो, वूट यांसारखे ओटीटी स्पर्धक लहान मुलांसाठी उत्तमोत्तम कार्यक्रम आणण्यासाठी प्रयत्न करत असताना ‘वूट’सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मने खास मुलांसाठी स्वतंत्र विभाग विकसित करत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. नुकतेच बालदिनाचे निमित्त साधून त्यांनी खास मुलांसाठी ‘वूट किड्स’ स्वतंत्रपणे लाँच केले आहे. ‘वूट किड्स’च्या प्लॅटफॉर्मवर लहान मुलांना एकाच छताखाली पेपा पिग, पोकेमॉन, निंजा हातोरी, शिनचॅन, मोटू पतलू आणि छोटा भीमसारख्या कार्टून्सचा आनंद घेता येणार आहे. यावरचे कार्यक्रम पाहण्यासाठी महिन्याला १०० आणि वर्षांला ८०० रुपये दर आकारला जाणार आहे. ‘वूट इंडिया’चे व्यवसाय प्रमुख सौगातो भौमिक यांनी लहान मुलांच्या वाढत्या बाजारपेठेविषयी आपली भूमिका मांडली. ‘सध्या लहान मुलांना तंत्रज्ञानापासून दूर ठेवणे अशक्य आहे. कारण माहिती तंत्रज्ञान माणसाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यांना दूर ठेवण्याऐवजी लहान मुलांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कसे शिक्षण देता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दोन ते तीन वर्षांत देशातील लहान मुलांसाठीच्या आशयनिर्मितीत आणि त्यांच्या प्रेक्षकसंख्येतही वेगाने वाढ होते आहे. नवीन तंत्रज्ञानासोबत त्यात नवीन बदल होताना दिसत आहेत. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याने या क्षेत्रात रोजगार निर्मितीलाही वाव आहे’, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘वूट किड्स’सारखा स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देताना देशभरातील ० ते १५ वर्षांतील मुलांना डोळ्यासमोर ठेवत आशय ठरवला गेला आहे.  कार्टून्सच्या जोडीने विविध पौराणिक कथा याशिवाय छोटे प्रश्न, शब्दकोडे यांचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुलांसाठी वेगळ्या प्लॅटफॉर्मची गरज ओटीटी कंपन्यांना का भासते आहे? आणि आतापर्यंत स्वतंत्रपणे ओटीटी प्लॅटफॉर्म का विकसित करण्यात आले नाहीत, असे प्रश्न उपस्थित होतात. लहान मुलांसाठी अ‍ॅप किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म विकसित करताना काही विशेष गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मुलांना सहजपणे सुरू करता येईल अशी त्याची रचना, त्यांना आकर्षित करेल असा ग्राफिकल युजर इंटरफेस, याशिवाय मुलांसाठी गरजेच्या असलेल्या पॅरेन्टल कंट्रोल किंवा लॉकसारख्या सुरक्षा योजना या गोष्टी खूप आवश्यक असतात. ‘यूटय़ूब किड्स’ आणि नवीन आलेले ‘वूट किड्स’वर या गोष्टींचा विचार केलेला दिसून येतो. त्यामुळे त्यांचे ग्राफिकल युजर इंटरफेस लहान मुलांना आवडतात. ‘पॅरेन्टल कंट्रोल’मध्ये पालकांना मुलांच्या घडामोडीवर लक्ष ठेवता येते. मुलांसाठी संकेतशब्द निश्चित करण्यापासून त्यांनी त्यावर किती वेळ व्यतीत केला, काय काय पाहिले याची माहिती पालकांना मिळू शकते. या सोयीमुळे मुलांना ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर येऊ देण्याबाबत पालकांना दिलासा मिळाला आहे. त्याचा परिणाम वाढत्या प्रेक्षक संख्येच्या रूपात दिसून येतो.

मात्र असे असले तरी मुलांसाठी स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्म्स निर्माण करत त्यावर दर्जेदार कार्यक्रम देताना काही काळजी घेणे आवश्यक आहे, त्यासंदर्भातील कायदे-नियम यांची काटेकोर अंमलबजावणी होते आहे की नाही हे लक्षात घेणे गरजेचे असल्याचे मत अर्ली चाइल्ड असोसिएशनच्या डॉ. स्वाती पोपट यांनी व्यक्त के ले. तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर मुलांसाठी घातक ठरू शकतो, असे त्या म्हणतात. ‘लहान मुले इतरांचे अनुकरण करतात. त्यांची कल्पनाशक्ती, भावविश्वात कार्टून्सना महत्त्वाचे स्थान असते. त्यामुळे कार्टून्स किंवा तत्सम कार्यक्रमातूनही लहान मुलांपर्यंत काय आशय पोहोचतो आहे हे पालकांनी पाहिले पाहिजे. संशोधक, डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञांकडून लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या आशयाची पडताळणी केली पाहिजे.  यात कार्टून्सचा आशय, त्याचा मुलांवर होणारा परिणाम, काही वाईट शब्द नाहीत याची खात्री केली जाते. या गोष्टींची शहानिशा केल्यावरच मालिका आणि कार्टूनला संकेतस्थळ आणि अ‍ॅपवर दाखवण्याची परवानगी दिली पाहिजे. परदेशात तेथे प्रत्येक गोष्टीची चाचपणी केली जात असल्याने तेथील लहान मुलांचा आशय नियोजित आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. अर्थात, ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर लहान मुलांसाठीचे कार्यक्रम वाढत असले तरी अजूनही हे प्रयोग प्राथमिक स्तरावर आहेत. त्याची बाजारपेठ नेमकी कशी विस्तारेल हे लक्षात येण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल.