पंकज भोसले

वरवर साध्या वाटणाऱ्या आणि अत्यंत ओळखीच्या फाम्र्युल्याला वाकवून काय करता येऊ शकते, याचा शोध घ्यायचा झाला तर यंदा ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या गटात दाखल झालेल्या ‘ग्रीन बुक’ या सिनेमाकडे पाहावे लागेल. म्हणजे कृष्णवर्णी आणि श्वेतवर्णी या परस्परविरोधी रंगांच्या आणि ढंगाच्या व्यक्तिरेखांना एकत्रितरीत्या नायक म्हणून हॉलीवूडच्या सिनेमांनी कित्येक दशके वापरले आहे. वेगवान हाणामारीच्या ‘बडी सिनेमां’मध्ये गौरवर्णी मध्यवर्ती व्यक्तिरेखेला शत्रूंशी लढाया आणि दुश्मनांवर चढाया करण्यात आत्यंतिक मदत करणाऱ्या काळ्या व्यक्तिरेखा ‘फोर्टी एट अवर्स’ या गाजलेल्या सिनेमापासून सक्रिय होत्या. पुढे विल स्मिथ-टॉमी ली जोन्स यांच्या ‘मेन इन ब्लॅक’ चित्रपटामध्ये कृष्णवंशीय मदतनीसाऐवजी सहनायक बनून (अमेरिकेसह) जगाचे परग्रहवासीयांपासून संरक्षण करताना दाखविला गेला. गेल्या दोन दशकांतील हॉलीवूड सिनेमांमध्ये डेन्झल वॉशिंग्टन, मॉर्गन फ्रीमन, सॅम्युअल जॅक्सन, जिमी फॉक्स या कलाकारांचे प्रमुख अस्तित्त्व हे अमेरिकी नागरी हक्क चळवळीमुळे झालेल्या घुसळणुकीचे अपत्य आहे. चित्रसाक्षरता प्रचंड प्रमाणात असली तरीही अमेरिकेत वंशविद्वेशाच्या आणि भेदभावाच्या घटनांना खळ नाही आणि त्यामुळेच हॉलीवूडकडून त्यातील सूक्ष्म घटनांनाही आफाट सिनेमूल्य प्राप्त करून देण्याची संधी चालून येते.

‘ग्रीन बुक’ ही बडीमूव्ही प्रकारातील पूर्वसुरींसारखी अ‍ॅक्शन फिल्म नाही. तिला संदर्भ आहे तो १९६० च्या दशकात हजारो मैलांचा प्रवास करण्यासाठी निकड म्हणून एकत्र यावे लागणाऱ्या दोन व्यक्तींच्या आयुष्यातील घटनांचा. दिग्दर्शक पीटर फेराली यांनी अत्यंत चलाखपणे  परस्परविरोधी व्यक्तिरेखांची मैत्रउभारणी रंगवली आहे.

चित्रपट सुरू होतो तो फ्रँक व्हॅलालाँगा ऊर्फ टोनी लीप (व्हीगो मॉर्टेन्सन) या न्यू यॉर्कमधील बारमध्ये बाउन्सरचे काम करणाऱ्या रांगडय़ा व्यक्तीच्या उचापत्यांपासून. हरहुन्नरी आणि धूर्तपणाचा कळस असलेला इटालियन-अमेरिकी टोनी लीप आपल्या भल्या मोठय़ा एकत्र कुटुंबातही ‘दादा’गिरीचे जगणे अनुभवत असतो. पत्नी आणि मुलावर यच्चयावत प्रेम करणाऱ्या टोनीवर तात्पुरती बेकारी कोसळते आणि ती संपविण्यासाठी थोडय़ा मेहनतीत मोठा मोबदला देणारे काम त्याच्याकडे तातडीने चालून येते. डॉन शर्ली (महर्शला अली) या कृष्णवंशी   पियानो वादकाच्या अमेरिकेच्या दक्षिण प्रांतात होणाऱ्या विशेष दौऱ्यासाठी महिनोन् महिने चालणाऱ्या प्रवासात त्याच्या चालक आणि सुरक्षारक्षकाचे असे दुहेरी काम तो नाखुशीने स्वीकारतो. जात्याच कृष्णवंशीय व्यक्तींवरील असेलेला राग चांगल्या आर्थिक मोबदल्यासाठी विसरून टोनी आपला आब ढळू न देण्याची काळजी घेत सुरू करतो.  करारपत्रानुसार मोबदल्यासह त्याला शर्लीच्या रेकॉर्ड कंपनीकडून एक ‘ग्रीन बुक’ प्राप्त होतो, ज्यात भेदभाव प्रचलित असलेल्या भागातून प्रवास करताना कृष्णवंशीय नागरिकांना राहण्यासाठी आणि त्यांच्या सोयी-सुविधांची माहिती लिहिलेली असते. त्या आधारावर सुरू झालेल्या प्रवासामध्ये डॉन शर्लीच्या उच्चभ्रू राहणी आणि विचारसरणीचा टोनी लीपच्या निम्न राहणी आणि तितक्याच पातळीवरच्या विचारशक्तींशी टक्कर घडायला लागते. या संघर्षांचे फलित दोघांमधल्या नातेसंबंधांत सुधारणेत दिसून येते.

अमेरिकेतील वंशजाणिवा आणि भेदभाव रूढ असलेला १९६०चा काळ हा चित्रपटातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जॅझ आणि निग्रो संगीतासोबत बिटल्स लोकप्रिय असलेल्या युगात शर्ली या कृष्णवंशीय पियानो वादकाची थेट अमेरिकी राष्ट्राध्यक्षासोबत असलेली घसट यात एका प्रसंगात ठळक होते. अन् तरीही ठिकठिकाणी प्रवासामध्ये केवळ कृष्णवंशीय म्हणून दिली जाणारी वागणूक टोनी लीपला बोचायला लागते. टोनी लीप शर्लीच्या पियानोवरील अद्भुत कसबाला पाहून चालक-सुरक्षारक्षक यापलीकडे खासगी सचिव म्हणूनही राबू लागतो आणि भवताली गोऱ्या लोकांनी उभारलेल्या विचित्र परिस्थितीत आपल्यातील वंशविद्वेश विसर्जित करतो.

हजारो मैलांचा प्रवास असला तरी हा चित्रपट ‘रोड मूव्ही’ गटात बसविता येत नाही. आघाडीची व्यक्तिरेखा संगीतकार असल्याने धून आणि गीतांची बरसात असूनही संगीतपट म्हणून त्याची ओळख बनू शकत नाही. चरित्रपटांमध्येही त्याची गणना होऊ शकत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये इतिहासातील अलक्षित छोटय़ा धाग्यांना वास्तव आणि कल्पनेचे अस्तर लावून परिणामकारक चित्रपट घडविण्यात दिग्दर्शक मोठय़ा प्रमाणात यशस्वी होत आहेत. यात ‘फॉरेस्ट गम्प’पासून ‘ट्रम्बो’पर्यंत कितीतरी उदाहरणे घेता येतील.

टोनी लीप याच्या मुलानेच लिहिलेल्या ‘ग्रीन बुक’च्या कथेमध्ये दुराग्रही व्यक्तिरेखांमध्ये आमूलाग्र बदल घडविणाऱ्या भावस्पर्शी घटनांची रेलचेल आहे. दोन मित्रांच्या अनुषंगाने ज्या एरव्ही साध्या आणि फॉम्र्युलाबद्ध वाटत असल्या तरी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अभिनयासह मिळालेल्या ऑस्करच्या मानांकनाने त्यांचे महत्त्व आणखी अधोरेखित झाले आहे.