26 February 2021

News Flash

‘शतदा प्रेम करावे’ मधून अरुण दाते यांचा जीवनपट

‘शतदा प्रेम करावे’ असे या आत्मचरिरत्राचे नाव असून ते ‘मोरया प्रकाशन’ यांनी प्रकाशित केले आहे.

आत्मचरित्राचे आज प्रकाशन

‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘शुक्रतारा मंद वारा’,   यासारखी अनेक अवीट गोडीची गाणी रसिकांना देणारे ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या आत्मचरित्राचे उद्या (२६ मे) रोजी प्रकाशन होत आहे. ‘शतदा प्रेम करावे’ असे या आत्मचरिरत्राचे नाव असून ते ‘मोरया प्रकाशन’ यांनी प्रकाशित केले आहे.

काही वर्षांपूर्वी अन्य एका प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन तेव्हा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. सध्या हे पुस्तक बाजारात उपलब्ध नव्हते. लोकांच्याही हे पुस्तक विस्मृतीत गेले होते. दाते यांच्यावर काही तरी पुस्तक काढावे, असे मनात होते. दाते यांचे पुत्र अतुल यांच्याकडे ही इच्छा बोलून दाखविली तेव्हा त्यांनी या पुस्तकाचा उल्लेख केला व सध्या ते उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे काही नवी माहिती तसेच काही मान्यवरांनी दाते यांच्याविषयी व्यक्त केलेले मनोगत, आठवणी यांची भर घालून ‘शतदा प्रेम करावे’ आकाराला आले. साडेतीनशे पानांच्या या पुस्तकात २४ पाने रंगीत छायाचित्रांची आहेत, असे मोरया प्रकाशन संस्थेचे दिलीप महाजन यांनी सांगितले.

‘शुक्रतारा’ या गाण्याला नुकतीच पूर्ण झालेली ५५ वर्षे, देशात आणि परदेशात ‘शुक्रतारा’चे झालेले २ हजार ६०० प्रयोग, अरुण दाते यांचे ८३ व्या वर्षांतील पदार्पण या सगळ्याच्या निमित्ताने मराठी भावसंगीतातील ‘शुक्रतारा’ असणाऱ्या अरुण दाते यांचे जीवनप्रवास नव्या स्वरूपात आम्ही सादर करीत असल्याचेही महाजन म्हणाले. २६ मे रोजी पुण्यात यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात सायंकाळी साडेपाच होणाऱ्या खास सोहळ्यात या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय  कुवळेकर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच या वेळी अरुण दाते यांच्या गाण्यांचा ‘स्वरगंगा’ हा कार्यक्रम होणार आहे.  मंदार आपटे, श्रीरंग भावे, शरयू दाते, रेवा तिजारे हे कलाकार दाते यांची गाणी सादर करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 2:07 am

Web Title: arun date biography in shatada prem karave
Next Stories
1 न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय  चित्रपट महोत्सवात ‘हायवे’ उत्कृष्ट 
2 आत्माराम भेंडे यांच्या आठवणींना उजाळा
3 VIDEO: हे पाहून तुम्ही दीपिकाच्या आणखीनच प्रेमात पडाल!
Just Now!
X