विद्या बालनचा आगामी सिनेमा ‘बेगम जान’चे तिसरे ‘ओ रे कहारो’ गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याआधी ‘प्रेम मे तोहरे’ आणि ‘आझादियां’ ही गाणी प्रदर्शित करण्यात आली होती. ‘ओ रे कहारो’ या गाण्यातून विद्याचा क्रूरपणा आणि अगतिकता दिसून येते. दुसऱ्या महिलांसोबत वागताना तिच्यातला निष्ठूरपणा या गाण्यात दाखवण्यात आला आहे. पण ती हे सगळं त्यांच्यात स्वबळावर जगण्याचा आत्मविश्वास तयार व्हावा, यासाठीच करत असते. या गाण्यातून कुंटणखान्याची मालकीण कशी असेल, याची माहिती नक्कीच मिळते.
तिथे राहणाऱ्या महिलांना कशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते याचे उत्तम चित्रण या गाण्यात केले आहे. कौसर मुनीरचे बोल असलेले हे गाणे ऐकताना आणि बघताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. अनु मलिकचे संगीत असलेल्या या गाण्याला कल्पना पतोवरी आणि अल्तामश फरिदी यांनी आवाज दिला आहे.
या सिनेमात विद्याशिवाय अजून, ११ अभिनेत्रींचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विद्याने या सिनेमात कुंटणखान्याच्या मालकिणीची व्यक्तिरेखा साकारली आहे. श्रीजित मुखर्जीच्या दिग्दर्शनात बनलेला हा सिनेमा राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘राजकाहिनी’ या बंगाली सिनेमाचे हिंदी व्हर्जन आहे. या सिनेमातील विद्याचा लूक आणि भूमिकेवर असणारी तिची पकड पाहता विद्याच्या अभिनयाचे कौशल्य ‘बेगम जान’च्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळणार, अशी अपेक्षा प्रेक्षकांमध्ये आहे. या सिनेमात विद्यासोबतच इला अरुण, गौहर खान, आशिष विद्यार्थी, रजित कपूर आणि नसिरुद्दीन शहा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 7:02 pm