‘पद्मावत’ प्रदर्शित होऊन एक आठवडाही उलटला नसताना या चित्रपटाला पहिला पुरस्कार मिळाला आहे. खुद्द अभिनेता रणवीर सिंगनेच याविषयीची माहिती दिली. तुम्हालाही प्रश्न पडला ना, की ‘पद्मावत’च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा हा पुरस्कार आहे तरी कोणता? हा पुरस्कार म्हणजे अमिताभ बच्चन यांनी रणवीरच्या भूमिकेची केलेली प्रशंसा. बिग बी नेहमीच नव्या जोमाच्या कलाकारांच्या कामाची प्रशंसा करतात. एखाद्या कलाकाराचं काम मनापासून आवडलं तर ते पत्र किंवा पुष्पगुच्छ घेऊन त्या कलाकाराचं कौतुक करतात. ‘पद्मावत’च्या निमित्ताने रणवीरला हा बहुमान मिळाला.

एकीकडे चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असतानाच रणवीरच्या भूमिकेने या सर्व वातावरणात ‘चार चाँद’ लावले आहेत. अमिताभ यांना त्याने साकारलेली अलाउद्दीन खिल्जीची भूमिका इतकी भावली की त्यांनी एक सुरेख पुष्पगुच्छ देत रणवीरला दाद दिली. त्यांनी पाठवलेलं हे पुष्पगुच्छ आपल्यासाठी फार महत्त्वाचं असून, हीच आपल्या कामाची पोचपावती आहे, अशाच भावनेने रणवीरचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने लगेचच सोशल मीडियावर या पुष्पगुच्छाचा फोटो शेअर करत लिहिले, ‘मला माझा पुरस्कार मिळाला आहे…’. रणवीरची ही पोस्ट पाहता बिग बींनी केलेली प्रशंसा ही त्याच्यासाठी पुरस्काराहून कमी नाही हेच स्पष्ट होतेय. त्यामुळे एका अर्थी प्रदर्शनानंतरच्या पहिल्याच आठवड्यात ‘पद्मावत’ला घवघवीत यश मिळालं आहे असं म्हणायला हरकत नाही.

VIDEO : ‘लल्लाटी भंडार’वर खिल्जी थिरकतो तेव्हा

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ प्रदर्शित होण्यापूर्वी रणवीरच्या भूमिकेवर अनेकांचं लक्ष होतं. पण, चर्चा मात्र दीपिकाने साकारलेल्या राणी पद्मावतीच्या भूमिकेच्याच होत होत्या. पण, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली असून, भन्साळींच्या ‘पद्मावत’मध्ये रणवीरचं नाणं खणखणीत असल्याचीच प्रतिक्रिया प्रेक्षक आणि समीक्षकांनी दिली. आता तर खुद्द अमिताभ बच्चन यांनीही बॉलिवूडच्या या खिल्जीच्या अभिनयाची प्रशंसा केल्यामुळे हे त्याचं आणि चित्रपटाचं यश आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.