‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ११ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एका नव्या कथानकाला हात घालण्याचा प्रयत्न दिग्दर्शक श्री नारायण सिंग यांनी केला आहे. सध्या या चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर चर्चेत असताना या उत्साही वातावरणात आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘गोरी को लठ्ठ मार’ असे बोल असणाऱ्या या गाण्यात अक्षय आणि भूमी म्हणजेच केशव आणि जयाच्या नात्याची एक वेगळीच बाजू पाहायला मिळत आहे.

प्रेम करणं जितकं सोपं असत तितकंच ते निभावणं कठीण असतं हे म्हणतात ते खरंच आहे याचा अंदाज ‘लठ्ठ मार’ या गाण्यातून होत आहे. सोनू निगम आणि पलक मुछाल यांनी गायलेल्या या गाण्याला मानस- शिखर या संगीतकार जो़डीने संगीत दिलं आहे. गरिमा आणि सिद्धार्थ या जोडीने लिहिलेल्या या सुरेख गाण्यामध्ये बऱ्याच कलाकारांचा सहभागही आहे. मुख्य म्हणजे उत्तर भारतात प्रसिद्ध असलेल्या लठ्ठमार होळीची झलकही यात पाहायला मिळतेय. त्यामुळे या ऑफ सीझन होळीचे रंग आणि अक्षय- भूमीच्या ऑनस्क्रीन प्रेमातील रुसवे- फुगवे प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत.

वाचा : ‘लगान’मधील ‘ती’ सध्या काय करते?

गेल्या वर्षीपासून अक्षय कुमारला चित्रपटसृष्टीत बरंच यश मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. विविध विषय हाताळत चौकटीबाहेरील भूमिकांना न्याय देणाऱ्या खिलाडी कुमारने साकारलेला केशव प्रेक्षकांची दाद मिळवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भारतामध्ये स्वच्छता आणि शौचालय या महत्त्वांच्या गोष्टींबद्दल ग्रामीण भाग आजही अविकसित आहे हे नाकारता येणार नाही. तेव्हा हाच मुद्दा अधोरेखित करत ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा चित्रपट साकारण्यात आला आहे.