देशभरात सध्या करोनाचा कहर वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच देशात लसीकरणही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. लसीकरणाच्या प्रक्रियेला हातभार लावण्यासाठी आता दाक्षिणात्य अभिनेता, तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी पुढे आला आहे. त्याने सिने कर्मचाऱ्यांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या आपल्या व्हिडिओमधून त्याने ही घोषणा केली आहे. गुरुवारपासून म्हणजे उद्यापासून ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लस देण्यास सुरुवात होणार आहे. चिरंजीवीने आपल्या करोना क्रायसिस चॅरिटी संघटना आणि अपोलो हेल्थच्या सहकार्याने ही लसीकरण मोहीम राबवणार असल्याचं जाहीर केलं आहे.

या मोहिमेअंतर्गत सिने वर्कर्सना मोफत करोना प्रतिबंधक लस देणार असून त्यांना औषधेही कमी दरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. चिरंजीवीने हेही सांगितलं की, या कर्मचाऱ्यांच्या पत्नी जर लस घेण्यास पात्र असतील तर त्याही या मोहिमेचा लाभ घेऊन लस घेऊ शकतात. ही मोहीम एक महिनाभर चालेल आणि सिने कर्मचाऱ्यांसोबतच पत्रकारही या मोहिमेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

चिरंजीवीच्या आधी अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी या महामारीदरम्यान मदतकार्य केलं आहे. प्रभास, राम चरण, ज्युनियर एनटीआर, नागार्जुन या कलाकारांनी गेल्या वर्षी चिरंजीवीच्या या संघटनेला मदत केली होती. ज्यामुळे अनेक सिने कर्मचाऱ्यांना मदत मिळाली होती.

या बाबतीत बॉलिवूड कलाकारही कमी नाहीत. अभिनेता सोनू सूदने या महामारीदरम्यान मजूरांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्याची सोय केली होती. तसेच अनेकांना वैद्यकीय मदतही मिळवून दिली होती. त्याचं हे मदतकार्य अजूनही सुरु आहे. अक्षय कुमार, शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन हे कलाकारही मदतीसाठी पुढे आले होते.