हिंदी चित्रपटसृष्टीतील जुन्याजाणत्या अभिनेत्यांना पुन्हा एकवार चरित्र व्यक्तिरेखांसाठी मागणी वाढू लागली आहे. विनोद खन्ना, मिथून चक्रवर्ती हे दोघेही सध्या हिंदी चित्रपटांमधून वेगवेगळ्या नायकांबरोबर विविध चरित्र व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहेत. यात आता डॅनी डॅंग्झोपा या अभिनेत्याचीही भर पडली आहे. डॅनी सध्या फार निवडक हिंदी चित्रपटांमधून काम करताना दिसतात. इम्रान खानबरोबर लक चित्रपटात काम केल्यानंतर डॅनीने कुठलाही चित्रपट केला नव्हता. अक्षय कुमारने आपल्या बॉस या चित्रपटात बिग बॉसच्या भूमिकेसाठी डॅनीची निवड केली आहे.
याआधी अक्षयच्या ‘चांदनी चौक टु चायना’मध्ये अक्षयने मिथुन चक्रवर्तीबरोबर जोडी जमवली होती. त्यानंतर ‘पतियाला हाऊस’साठी ऋषी कपूर आणि आता ‘बॉस’साठी त्याने डॅनीबरोबर जोडी जमवली आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणे अक्षय त्यात ‘बॉस’ आहे हे उघड आहे. पण, त्याच्याही वरचा बॉस किंवा मार्गदर्शक म्हणून एखादा ताकदीचा अभिनेता अक्षय कु मारला हवा होता. म्हणून त्याने या ‘बिग बॉस’साठी डॅनीची निवड केली. डॅनी यात बिग बॉसच्या भूमिकेत असले तरी त्यांची भूमिका खलनायकी नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. डॅनीबरोबरच मिथून चक्रवर्तीही ‘बॉस’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे.