बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया आणि डीजे अकील यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. संदेसरा बँक कर्ज प्रकरणात या दोघांना सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. हा घोटाळा सुमारे साडेचौदा हजार कोटी रुपयांचा असून याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे.
स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड, संदेसरा ग्रुप आणि नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दीप्ती चेतन संदेसरा यांनी बँकांना साडेचौदा हजार कोटींचा चुना लावल्याचा आरोप आहे. या संदेसरा कुटुंबातील लोकांनी खोट्या कंपन्या दाखवून अनेक कोटींचे कर्ज घेतले होते. ऑक्टोबर २०१७ मध्ये सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. डिनो आणि डीजे अकीलसोबत या कंपनीचे काही व्यवहार झाल्यामुळे त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत.
स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड, संदेसरा ग्रुप, नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दीप्ती चेतन संदेसरा यांच्याविरोधात सीबीआयने पाच हजार ७०० कोटी रुपयांच्या फसवणुकीची केस दाखल केली होती. हा घोटाळा पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यापेक्षा देखील मोठा असल्याचे म्हटले जात आहे. पंजाब नॅशन बँकेचा घोटाळा हा ११ हजार ४०० कोटींचा होता. त्याहीपेक्षा कित्येक पटीने मोठा हा घोटाळा असल्याचा दावा ईडीने केला आहे.
डिनो मोरियाने ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटापासून त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने त्यानंतर ‘राज’, ‘अक्सर’, ‘लाइफ में कभी कभी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. डिनो गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. ‘अलोन’ या २०१५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सोलो’ या तामिळ चित्रपटात तो झळकला होता. त्यानंतर तो कोणत्याच चित्रपटात झळकला नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 2, 2019 5:35 pm