एखादी मालिका किंवा वेब सीरिज सुरु होण्यापूर्वी किंव सुरु झाल्यानंतर त्यात मांडण्यात येणाऱ्या गोष्टी अनेकदा चर्चेचा आणि वादाचा विषय ठरतात. सोशल मीडिया आणि देशाच्या राजकीय पटलावर सध्या एका वेब सीरिजमुळे चांगल्याच वादाने तोंड वर काढलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजविषयी प्रतिक्रिया देत एक ट्विट केलं. आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास असल्याचं म्हणत गांधी यांनी एक लक्षवेधी ट्विट केलं. ज्यावर अनुराग कश्यपनेही ‘दॅट्स येय…’ असं लिहित प्रतिक्रिया दिली.

‘माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे. स्वातंत्र्य हा मूलभूत लोकशाही अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे असे भाजपा आणि आरएसएसला वाटते. माझे वडील या देशासाठी जगले, देशासाठी त्यांनी मरण पत्करलं, हे सत्य ‘सेक्रेड गेम्स’ या कल्पक वेब सीरिजमधल्या पात्रांमुळे बदलणार नाही असं टि्वट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केलं’, असं राहुल गांधी ट्विटच्या माध्यमातून म्हणाले होते.

‘सेक्रेड गेम्स’मधून दिवगंत पंतप्रधान राजीव गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत सध्या एका नव्या प्रकरणाने डोकं वर काढलं आहे. या वेब सीरिजमधील काही दृश्य हटवण्याची मागणीसुद्धा करण्यात आली असून, त्याविषयी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. नेटफ्लिक्सवरील या सीरिजमध्ये आणीबाणी, बोफोर्स घोटाळा आणि शाह बानो या सर्व प्रकरणांवरही प्रकाशझोत टाकण्यात आल्यामुळेच हा विरोध होत आहे. पण, खुद्द राहुल गांधी यांनीच याविषयी ट्विट केल्यामुळे ‘सेक्रेड गेम्स’च्या सहदिग्दर्शनाची धुरा सांभाळणाऱ्या अनुरागनेही त्यांच्या या भूमिकेला प्रशंसनीय ठरवलं आहे.

Get set post…- जगातलं सर्वाधिक उंचीवरील पोस्ट ऑफिस भारतात, तुम्ही पाहिलं का?

दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्करनेही त्यांची प्रशंसा केली आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा अधोरेखित करत राजकारणात सक्रिय असणाऱ्या राहुल गांधी यांची ही भूमिका प्रशंसनीय आहे, असं म्हणत स्वराने एक ट्विट केलं. ज्या ठिकाणी गोष्टींना दाद देणं गरजेचं आहे, तिथे ती दिलीच गेली पाहिजे हेसुद्धा तिने या ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केलं.