बॉलिवूडचा गायक हिमेश रेशमिया पुन्हा एकदा आपल्या जुन्या अंदाजात आपल्या आयकॉनिक कॅप आणि माइकसह प्रेक्षकांसमोर परतलाय. करोना काळात प्रेक्षकांचा मूड फ्रेश करण्यासाठी त्याने त्याचा तिसरा स्टूडिओ अल्बम सॉंग “सुरूर २०२१” रिलीज केलाय. त्यानंतर नेटकऱ्यांनी या गाण्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.

गायक हिमेश रेशमियाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून त्याचं नवं गाणं “सुरूर २०२१” रिलीज केल्याचं सांगितलं. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, ” हिमेश रेशमिया मेलोडीज या यूट्यूब चॅनलवर ‘सुरूर २०२१’ हे नवं अल्बम सॉंग आऊट झालं आहे…या गाण्याला तुम्हा सर्वाचं प्रेम भरभरून द्या…जय माता दी…लेट्स रॉक…सुरूर गर्ल उदिती सिंग..”

हिमेश रेशमियाचं हे गाणं रिलीज होताच यूट्यूबवर ट्रेंड झालं आहे. यावरूनच प्रेक्षकांना हिमेशच्या जुन्या अंदाजातील गाणं किती आवडलं आहे याचा अंदाज येतोय. एकीकडे हिमेशचे चाहते अल्बम सॉंग पाहून त्याच्या अभिनयाचं आणि गाण्याचं कौतुक करत आहेत तर दुसरीकडे या अल्बम सॉंगवर अनेक मीम्स सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. हे मीम पाहून प्रेक्षक स्वतःचं हसू रोखू शकत नाहीयेत. चाहते देखील या मीमची मजा घेत आहेत. एका मीममध्ये चाहत्यांनी त्याच्या गाण्याची तुलना करोना लसीसोबत केली आहे. या गाण्याचा गायक, गीताकर, संगीतकार आणि व्हिडीओ डायरेक्टरच्या नावासाठी स्वतः हिमेश रेशमियाचंच नाव दिल्याने यावर सुद्धा नेटकऱ्यांनी मीम तयार केले आहेत. ‘मै..मेरेको सब कुछ आता है’ अशा मीम्समधून नेटकऱ्यांनी हिमेश रेशमियाची खिल्ली उडवली आहे.

इथे पहा काही मीम्स:

हिमेश रेशमियाच्या या गाण्याला यूट्यूबवर आतापर्यंत ९ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. हिमेश रेशमियाचा सर्वात पहिला अल्बम ‘आप का सुरूर’ नंतर त्याच्या ‘सुरूर २०२१’ मध्ये कोणती सुरूर गर्ल दिसणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. ही सुरूर गर्ल उदिती सिंग असून कॉन्सर्टमध्ये गाणारा गायक आणि व्यावसायिक असे हिमेशचे दोन वेगवेगळे लूक यामध्ये पाहायला मिळत आहेत. सोबत उदिती सिंग ही रॉकस्टारची पत्नी असल्याचं दाखवण्यात आलंय.

गायक हिमेश रेशमियाचं हे गाणं सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतंय. ‘बिग बॉस पुन्हा आलाय’, ‘टोपिवाला परत आलाय’, ‘आपल्या अनोख्या अंदाजात हिमेश परत आलाय’, अशा अनेक कमेंट् चाहत्यांनी व्हिडीओवर केल्या आहेत.