अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सुमारे महिनाभराने सुटका झाली. रियाला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. रियाला जामीन मिळाल्यानंतर ‘देव अस्तित्वात आहे’, असं म्हणत तिची आई संध्या चक्रवर्ती भावूक झाली. या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत संध्या चक्रवर्ती म्हणाल्या, “तिने जे काही सहन केलंय, त्या त्रासातून ती कधी मुक्त होणार? त्यातून ती स्वत:ला कशी सावरणार? पण ती लढणार आणि तिला भावनिकदृष्ट्या सक्षम राहावंच लागेल. यातून सावरण्यासाठी तिला थेरपीची गरज लागेल आणि तिच्यासाठी ते सर्व मी करेन. कारागृहातून ती बाहेर आली याचा दिलासा तर आहेच. पण हे अजूनही संपलेलं नाही. माझा मुलगा तुरुंगातच आहे आणि उद्या काय घडेल याची चिंता सतत सतावतेय.”

या संपूर्ण प्रकरणामुळे चक्रवर्ती कुटुंबीयांवर कोणता परिणाम झाला याबाबत त्यांनी पुढे सांगितलं. “प्रत्येक वेळी जेव्हा घराची बेल वाजते, तेव्हा आम्हाला धडकीच भरते. आता कोण असेल याच्या कल्पनेनेच मनात धस्स होतं. आमच्या सुरक्षेसाठी आम्ही दारासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावून घेतला आहे.”

गेल्या काही महिन्यांमध्ये चक्रवर्ती कुटुंबीयांचे संपूर्ण आयुष्यच बदलले. “माझी मुलं तुरुंगात असताना मी घरी शांतपणे झोपूच शकत नाही. रात्री अपरात्री मला जाग येते आणि यापुढे अजून काय वाईट होईल याची भीती मनाला जाणवते. माझं संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालंय. हे सर्व संपवायचं असेल तर आत्महत्या हाच एक पर्याय आहे असा विचार अनेकदा माझ्या मनात आला. पण माझ्या मुलांसाठी मला जगायचंय असं स्वत:ला समजावत असते. माझी मुलं अत्यंत वाईट काळातून जात आहेत”, असं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांनी मुंबईतील रुग्णालयात प्रशासकीय प्रमुख म्हणून रुजू होण्यापूर्वी सैन्य दलात २४ वर्षे सर्जन म्हणून काम केलं. त्यांची पत्नी संध्या या ५५ वर्षांच्या असून त्या शिक्षिका म्हणून काम करत होत्या. इंद्रजीत हे बंगाली असून संध्या या महाराष्ट्रीयन आहेत. गेल्या १२ वर्षांपासून रियाचे कुटुंबीय मुंबईत राहत आहेत.