हॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता रोवन अ‍ॅटकिंसन यांचा आज वाढदिवस आहे. असे जर म्हटले तर पटकन कोणाच्याही लक्षात येणार नाही. पण, मिस्टर बीनचा आज वाढदिवस आहे असं जर का म्हटलं तर लगेचच अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि औत्सुक्याचे भाव उमटतील. एक अत्यंत लोकप्रिय अभिनेता लेखक आणि निर्माता रोवन अ‍ॅटकिंसन यांना त्यांच्या खऱ्या नावापेक्षा ‘मिस्टर बीन’ या टोपण नावानेच ओळखले जाते. १ जानेवारी १९९० साली रोवन अ‍ॅटकिंसन पहिल्यांदा आपल्या समोर ‘मीस्टर बीन’ अवतारात झळकले होते. खरं तर ही एक निव्वळ काल्पनिक व्यक्तिरेखा होती. परंतु या व्यक्तिरेखेने त्यांची रोवन अ‍ॅटकिंसन ही ओळखच पार पुसून टाकली. आज त्यांना संपूर्ण जग ‘मीस्टर बीन’ याच नावाने ओळखते. आज ६ जानेवारीला हे एव्हरग्रीन मिस्टर बीन ६५ वर्षांचे झाले आहेत.

‘मीस्टर बीन’ पलिकडले रोवन अ‍ॅटकिंसन

‘मीस्टर बीन’ ही रोवन अ‍ॅटकिंसन यांची सर्वाधिक गाजलेली व्यक्तिरखा आहे. मात्र त्यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अशा अनेक विनोदी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

रोवन अ‍ॅटकिंसन यांनी अभिनय कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळात ‘नॉट द नाइन ओ क्लॉक न्यूज’ आणि ‘ब्लॅकॅडर’ या सिरिजमध्ये काम केले होते. ‘ब्लॅकॅडर’सारख्या विनोदी सिरिजमध्ये त्यांनी मग्रूर ब्रिटिश उमरावाच्या भूमिकेने धम्माल उडवली होती. अ‍ॅटकिंसन यांनी फक्त अभिनय क्षेत्रातच नाही तर, रेडिओ विश्वातही एक वेगळीच छाप सोडली होती. १९७८ मध्ये ‘बीबीसी रेडिओ ३’ या वाहिनीवर त्यांचा ‘द अ‍ॅटकिंसन पिपल’ ही विनोदी कार्यक्रमाची मालिका विशेष गाजली होती. अ‍ॅटकिंसन आणि रिचर्ड कर्टिस यांनी या मालिकेचे लेखन केले होते.

लहानांपासून ते अगदी मोठ्यांच्या चेहऱ्यावरही आपल्या अतरंगी खुरापतींनी हसू उमटविणारे रोवन अ‍ॅटकिंसन आजही त्यांनी साकारलेल्या ‘मिस्टर बीन’साठी अधिक ओळखले जातात. पडद्यावर विनोदाला नवी परिभाषा देणारे रोवन हे त्यांच्या आयुष्यातही तितकेच विनोदी आणि मनमिळाऊ आहेत.