बॉलीवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याने त्याच्या आगामी सरकार ३ या चित्रपटाची घोषणा केल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. रामूच्या सरकार सिरीजमधील पहिल्या दोन्ही चित्रपटांना समिक्षक आणि प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटांमध्ये बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यानी मुख्य भूमिका साकारली होती.

आगामी ‘सरकार ३’  या चित्रपटात मनोज बाजपेई, जॅकी श्रॉफ, यामी गौतम, रोनित रॉय आणि अमित सध हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. यामी यात अन्नू करकर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. रोनीत रॉय हा पराग त्यागीची भूमिका साकारत असून अमित सध हा शिवाजी (चिकू) नागरेच्या भूमिकेत दिसेल. भरत दाभोळकर यात गोरख रामपूरच्या भूमिकेत तर रोहिणी हट्टंगडी या रुक्कू बाई देवीच्या भूमिकेत दिसतील.

अमितबद्दल बोलायचं झालं तर तो तापसी पन्नू हिच्यासह रनिंग शादी या अमित रॉय दिग्दर्शित चित्रपटात काही दिवसांपूर्वीच झळकला होता. ‘सरकार ३’ मध्ये अमित हा शिवाजी नागरे म्हणजेच चिकूची भूमिका साकारताना दिसणार आहे. चीकू हा सरकारचा नातू असून तो अतिशय गर्विष्ठ आणि लहरी असल्याचे चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. पिंकविला या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, अमितची व्यक्तिरेखा ही बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे याच्यावर आधारित असण्याची शक्यता आहे. आदित्य यांची बोलण्याचालण्याची जी त-हा आहे, त्याच्याशीच मिळतीजुळती अशी अमितची भूमिका असेल.

नेता आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदित्य हे सुपुत्र आहेत. ‘सरकार ३’ हा चित्रपट ठाकरे कुटुंबावर आधारित असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र, या वृत्तास चित्रपटकर्त्यांनी दुजोरा दिलेला नाही तसेच नाकारलेले देखील नाही. उद्या प्रदर्शित होणा-या या चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवरून वाद होण्याची शक्यता सेन्सॉर बोर्डाने दर्शविली आहे. त्यामुळे ट्रेलरमध्ये योग्य ती सूचना देण्यात यावी, असे सेन्सॉरने सांगितले आहे. दरम्यान, ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाची खरी कथा कळू शकते.

राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सरकार ३’ हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होईल. योगायोगाने याच दिवशी राम गोपाल वर्माचा वाढदिवस देखील आहे. रामूने कालच चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला होता. ‘अँग्रीयर दॅन एव्हर’ या टॅगलाइनला साजेसा असा ‘सरकार ३’चा पोस्टर आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार असलेले अमिताभ बच्चन, यामी गौतम, जॅकी श्रॉफ, मनोज बाजपेई आणि अमित सध यांच्या चेह-यावर रागिष्ट भाव या पोस्टरवर पहावयास मिळतो.